तेवीस लाख कोंबड्यांवर पशुसंवर्धन विभागाचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:23 AM2021-01-17T04:23:38+5:302021-01-17T04:23:38+5:30
जिल्ह्यात देशी कोंबड्यांची संख्या आठ लाख आहे. तसेच पलूस, खानापूर, आटपाडी, तासगाव, मिरज, वाळवा तालुक्यांतील पोल्ट्रीमध्ये १५ लाखांच्या कोंबड्या ...
जिल्ह्यात देशी कोंबड्यांची संख्या आठ लाख आहे. तसेच पलूस, खानापूर, आटपाडी, तासगाव, मिरज, वाळवा तालुक्यांतील पोल्ट्रीमध्ये १५ लाखांच्या कोंबड्या आहेत. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेतली आहे. या कार्यशाळेत पोल्ट्री अथवा देशी काेंबडी मृत दिसल्यास नागरिकांनी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा. तसेच पोल्ट्रीच्या बाहेर पोल्ट्री चालकांनी औषध फवारणी करून परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी केले आहे.
जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण झालेला एकही पक्षी आढळलेला नाही. जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि आरोग्य विभागातर्फे उपाययोजना करीत आहे. पाणथळांच्या जागांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. एखादा पक्षी मृतावस्थेत आढळल्यास त्याची दक्षता घेण्याच्या सूचना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती संजय धकाते यांनी दिली.
चौकट
मृत पक्ष्यांच्या तपासणीचा अहवाल दोन दिवसांत
मिरज तालुक्यातील सावळी येथे २९ साळुंख्या आणि तीन पारवे यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून, त्याचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. येत्या दोन दिवसांत तपासणीचा अहवाल येणार आहे. पशुसंवर्धन विभाग विशेष दक्षता घेत असून, जिल्ह्यात कुठेही बर्ड फ्लूचा पक्ष आढळून आलेला नाही. यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त संजय धकाते यांनी केले आहे.