चांदोली धरणाचे दरवाजे बंद करुन वाचविले जनावरांचे प्राण, उखळू येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 11:53 AM2024-08-27T11:53:20+5:302024-08-27T11:53:48+5:30
मुलाची सतर्कता अन् अधिकाऱ्यांचा समन्वय
आनंदा सुतार
वारणावती : चांदोली धरणातून पाणी सोडल्यानंतर उखळू (ता. शाहूवाडी) येथील एका शेतकरी महिलेकडील सहा जनावरे नदीपात्रातच अडकली होती; परंतु त्यांच्या मुलाने तातडीने धरण प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांनीही सतर्कता दाखवत धरणाचे दरवाजे बंद करुन सहा जनावरांचे प्राण वाचविले. त्यानंतर धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आले.
चांदोली परिसरात अतिवृष्टी झाल्याने धरणाचे वक्राकार दरवाजे उघडून नदीपात्रात २ हजार ४६५ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. सूचना धरण प्रशासनाने नागरिकांना दिली होती. त्याप्रमाणे सोमवारी दुपारी साडे चारच्या दरम्यान चांदोली धरणाचे दोन वक्राकार दरवाजे उघडले. पाण्याचा विसर्ग नदीपात्रात प्रवाहित झाला. मात्र, उखळू (ता. शाहूवाडी) येथील महिला शेतकरी सविता संजय वडाम व त्यांचा मुलगा अनिकेत हे दोघेजण सहा जनावरे रानात चरण्यासाठी घेऊन गेले होते. ही जनावरे नदीपात्रात उतरली होती. अचानक धरणातून पाणी सोडल्याने ही जनावरे पाण्यात अडकल्याचे लक्षात येताच त्यांची चिंता वाढली. जनावरे पाण्यातून वाहून जाण्याची भीती होती.
अनिकेतने त्यांच्या घराशेजारी राहणारे नाथा वडाम हे पाटबंधारे विभागात कोल्हापूर येथे कार्यरत आहेत, त्यांना मोबाइलवरून संपर्क करून घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी तत्काळ ही बाब वारणावती येथील संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून कळवली. अधिकाऱ्यांनी दोन वक्राकार दरवाजे काही मिनिटांतच बंद केले. नदीपात्रात अडकलेल्या सहा जनावरांना बाहेर काढण्यात आले. पुन्हा चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला.
नदीपात्रात जनावरे अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही दोन्ही दरवाजे बंद केले. नदीपात्रातून जनावरे काठावर गेल्याची खात्री केली. त्यानंतर आम्ही पुन्हा विसर्ग सुरु केला. -गोरख पाटील, शाखाधिकारी, वारणावती