अंनिसच्या पुढाकाराने आष्ट्यात भोंदू महिलेसह दोघांचा भांडाफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 02:04 PM2017-10-27T14:04:09+5:302017-10-27T14:13:10+5:30
अंगात दैवी शक्तीचा संचार होतो, अशा भूलथापा मारून आष्टा (ता. वाळवा) येथे गेल्या चार वर्षापासून विविध समस्यांवर उपाय सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदू महिलेसह दोघांचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गुरुवारी पर्दाफाश केला.
आष्टा , दि. २७ : अंगात दैवी शक्तीचा संचार होतो, अशा भूलथापा मारून आष्टा (ता. वाळवा) येथे गेल्या चार वर्षापासून विविध समस्यांवर उपाय सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदू महिलेसह दोघांचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गुरुवारी पर्दाफाश केला.
आष्टा पोलिसांच्या मदतीने अंनिसने स्टिंग आॅपरेशन केले. त्यांच्याविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन रात्री त्यांना अटक करण्यात आली.
कल्पना प्रकाश अत्तारकर (वय ३५, रा. पाचुंब्री, ता. शिराळा) व मुबारक मोहम्मद नदाफ (५२, मालगाव, ता. मिरज) अशी अटक केलेल्या भोंदूंची नावे आहेत. त्यांचा आष्ट्यात शिवाजी चौकातील एका इमारतीमागील खोलीत भोंदूगिरीचा व्यवसाय सुरु होता.
दोघेही पती-पत्नीप्रमाणे एकत्रित राहत होते. आमच्या अंगात दैवी शक्ती संचारते, असे सांगून ते विविध समस्या सोडविण्याचा दावा करीत होते. मूल न होणे, करणी काढणे, भूतबाधा काढणे, लग्न जमविणे, पती-पत्नीचे भांडण सोडविणे, प्रियकर-प्रेयसीचे भांडण सोडविणे, विवाहबाह्य अनैतिक संबंध, तसेच अनैतिक संबंध सुरक्षित यावर ते अघोरी उपाय सांगत असत. यासाठी ते पाचशे रुपयांपासून दहा हजारापर्यंत रक्कम घेत असत.
अंनिसकडे या भोंदूबुवांची तक्रार आली असता, अंनिसने या तक्रारीची चौकशी केली. त्यानंतर त्यांच्याकडे बोगस महिला ग्राहक म्हणून पाठविली. या बोगस ग्राहकाने माझ्या पतीने रखेल ठेवली आहे, ती त्यांना सोडत नाही, अशी तक्रार मांडली. यावर दोघांनी तिला अश्लील व अघोरी उपाय सांगितला. यासाठी तीन हजार रुपयांची मागणी केली. यातून या दोघांची भोंदूगिरी लक्षात येताच अंनिसने आष्टा पोलिसांच्या मदतीने गुरुवारी दुपारी छापा टाकला.
महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार, राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, राज्य बुवाबाजी संघर्षचे कार्यवाह भगवान रणदिवे, अवधूत कांबळे, अजय भालकर, सीताराम चाळके, प्रा. नितीन शिंदे, राजेंद्र मोटे, नीलेश कुडाळकर यांच्यासह पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील, पोलिस नाईक चंद्रकांत माने, अवधूत भाट, अरुण पाटील, अरुणा शिंदे यांनी संयुक्तपणे ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.
तक्रारदार पुढे आले...
मुबारक नदाफ व कल्पना अत्तारकर गेल्या चार वर्षांपासून भोंदूगिरीचा खुलेआम उद्योग करीत होते. त्यांच्याकडून अनेकांची फसवणूक झाली, पण प्रत्यक्षात तक्रार देण्यासाठी कोणीही पोलिस ठाणे अथवा अंनिसकडे गेले नाही. या दोघांना पकडल्याचे समजताच त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी महिला व तरुणींनी आष्टा पोलिस ठाण्यात गर्दी केली होती.
बुवाबाजीचे साहित्य जप्त
खोलीत बुवाबाजीचे साहित्य, मोरपीस गुच्छ, लाकडी पादुका, हळद-कुंकू, गुलाल, अष्टगंध, गळ्यातील ताईत, मुला-मुलींचा फोटो अल्बम, असे साहित्य सापडले आहे.
वाळवा तालुक्यात पहिलाच गुन्हा
महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश २०१३ नुसार कलम ३ (२) अनुसूची ५ अन्वये वाळवा तालुक्यात आष्टा येथे दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे. अटकेतील कल्पना अत्तारकर व मुबारक नदाफ यांना शुक्रवारी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. हे दोघे एकत्रित कसे राहत होते याचीही चौकशी होणार आहे.