अंकलीतील पाईप चोरीचा अखेर छडा
By admin | Published: June 25, 2015 10:48 PM2015-06-25T22:48:48+5:302015-06-25T22:48:48+5:30
तिघांना अटक : घरावर छापे; कसून चौकशी; तीन लाखांचा माल जप्त
सांगली : अंकली (ता. मिरज) येथील जैन ड्रीप इरिगेशन या पाईप विक्रीच्या गोदामात झालेल्या पाईप चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात सांगली ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. ही चोरी तिघांच्या टोळीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरलेल्या तीन लाख १५ हजाराच्या विविध आकाराच्या पाईपचे १५० बंडल जप्त करण्यात आले आहेत. अटक केलेल्यांत महेश गुंडाप्पा ऐवळे (वय २२), रत्नाकर ऊर्फ बाबू मधुकर कोलप (३२, दोघे रा. अंकली) व शीतल सुरेश परीट (२७, उदगाव, ता. शिरोळ) यांचा समावेश आहे. गोदामाच्या भिंतीवरुन येऊन तिघांनी पाईपचे १५० बंडल चोरुन नेले आहेत. हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. तो गेल्या आठवड्यात उघडकीस आला होता. याबाबत नितीन शिराळकर यांनी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांचे पथक दोन दिवसांपूर्वी अंकली परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी हे तिघेही संशयितरित्या फिरताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी पाईप चोरल्याची कबुली दिली. या पाईप त्यांनी अंकलीत भाड्याची खोली घेऊन तेथे ठेवल्या होत्या. तिथे छापा टाकून या पाईप जप्त केल्या. याशिवाय त्यांनी बोरगाव (कर्नाटक) येथेही काही प्रमाणात पाईप विकल्या होत्या. त्याही जप्त केल्या आहेत. (प्रतिनिधी)