अंकलखाेपचे जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले राष्ट्रवादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:19 AM2021-06-24T04:19:04+5:302021-06-24T04:19:04+5:30
ओळ : जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले यांनी बुधवारी मुंबईत अजित पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ...
ओळ : जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले यांनी बुधवारी मुंबईत अजित पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी एकनाथ खडसे, राजेंद्र शिंगणे, अरुण लाड उपस्थित हाेते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
अंकलखोप : अंकलखाेप (ता. पलूस) गटातील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले यांनी बुधवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार एकनाथ खडसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार अरुण लाड उपस्थित हाेते.
सांगली जिल्हा परिषदेत भाजपकडून नितीन नवले हे अंकलखोप गटातून चांगल्या मताधिक्याने निवडून आले होते. सामाजिक कार्य तसेच महापुरादरम्यान उभारलेल्या मदतकार्यामुळे ते नेहमी चर्चेत हाेते; पण भाजपमधील अंतर्गत कुरघाेड्यांमुळे त्यांना नेहमी त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे सामाजिक कार्यात त्यांच्यासमाेर अडचणी निर्माण होत होत्या.
जिल्हा परिषदेत एक कामाचा माणूस म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती; पण त्यांना म्हणावी अशी ताकद भाजपकडुन मिळत नसल्याची खदखद आमदार अरुण लाड यांच्या लक्षात आली. काही दिवसांपूर्वी औदुंबर येथे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटपाच्या कार्यक्रमात नितीन नवले राष्ट्रवादीच्या मंचावर दिसून आले. तेव्हापासून त्यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू होती.
बुधवारी त्यांनी मनोज नवले, सुशांत सूर्यवंशी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नवले यांच्या पक्षप्रवेशामुळे पलूस तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढली आहे. यामुळे आमदार अरुण लाड यांच्या गटात उत्साहाचे वातावरण आहे. एक निष्कलंक चेहरा पक्षाला मिळाल्याची प्रतिक्रिया आमदार अरुण लाड यांनी व्यक्त केली. या प्रवेशावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, ॲड. सतीश चौगुले, अनंत जोशी, महावीर चौगुले, शीतल बिरनाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.