सांगली : अण्णा हजारें दिल्लीतील लढ्याचे रणशिंग फुंकणार, २० जानेवारीला आटपाडीत सभा : कल्पना इनामदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 01:16 PM2017-12-22T13:16:47+5:302017-12-22T13:25:12+5:30
लोकपाल आणि लोकायुक्त यांची नियुक्ती करण्याबरोबरच शेतीमालाच्या हमीभावासह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दि. २३ मार्च रोजी दिल्ली येथे सत्याग्रह करणार आहेत. या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, यासाठी त्यांची महाराष्ट्रातील पहिली सभा दि. २० जानेवारी रोजी आटपाडी येथे घेण्यात येणार आहे, अशी माहिती समाजसेविका कल्पना इनामदार यांनी दिली.
आटपाडी : लोकपाल आणि लोकायुक्त यांची नियुक्ती करण्याबरोबरच शेतीमालाच्या हमीभावासह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दि. २३ मार्च रोजी दिल्ली येथे सत्याग्रह करणार आहेत. या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, यासाठी त्यांची महाराष्ट्रातील पहिली सभा दि. २० जानेवारी रोजी आटपाडी येथे घेण्यात येणार आहे, अशी माहिती समाजसेविका कल्पना इनामदार यांनी दिली.
इनामदार म्हणाल्या की, प्रत्येक राज्यातील कृषिमूल्य आयोग अभ्यास करुन कृषिमूल्य निर्धारित करुन राज्यातील कृषिमूल्य अधिकारी केंद्र व केंद्रीय कृषिमूल्य आयोग व केंद्र सरकार यांच्याकडे पाठवितात. पण आजपर्यंत केंद्र सरकारने यावर अंमलबजावणी केलेली नाही. त्यासाठी अण्णासाहेब हजारे सत्याग्रह करणार आहेत.
शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्या, शेतीमालाला हमीभाव, विजेची कायमस्वरुपी समस्या सोडविणे, पाण्याची कायमस्वरुपी समस्या सोडविणे, शेतकऱ्यांना ५ हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, निवडणुकांमध्ये सुधारणा करण्यात यावी, सरकारने शेतकऱ्यांचा १०० टक्के माल हमीभावाने खरेदी करावा या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. येथील बचत धामच्या पटांगणात ही सभा होणार आहे.
दुसरा केजरीवाल होणार नाही!
अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील आंदोलनात सामील झालेले अरविंद केजरीवाल पुढे राजकारणात जाऊन दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. आता यापुढे अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सामील होण्यासाठी कार्यकर्त्यांना, पुढे राजकारणात जाणार नाही, असे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. प्रामाणिकपणे केवळ समाजसेवा करण्याची इच्छा असलेल्यांनीच प्रतिज्ञापत्रासाठी संपर्क साधावा, असे आवाहन कल्पना इनामदार यांनी केले.