अण्णा म्हणाले, भाषणाला कृतीची जोड असेल तर देश बदलू शकतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:37 PM2019-01-13T23:37:14+5:302019-01-13T23:37:18+5:30
बिळाशी : देशासाठी विकास व निसर्ग दोन्हीही तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे शाश्वत विकास करायचा असेल, तर निसर्गाचे शोषण ...
बिळाशी : देशासाठी विकास व निसर्ग दोन्हीही तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे शाश्वत विकास करायचा असेल, तर निसर्गाचे शोषण करू नका, असे परखड मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
कोकरुड (ता. शिराळा) येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने आयोजित शिवाजीराव देशमुख व्याख्यानमालेत ते बोलत होते. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील अध्यक्षस्थानी होते.
अण्णा हजारे म्हणाले, भाषणाला कृतीची जोड असेल तर देश बदलू शकतो व देश बदलायचा असेल तर भारतातील खेडी बदलली पाहिजेत. खेड्यांमध्ये इमारती बदलून चालणार नाहीत, तर मानस बदलायला शिकले पाहिजे. मात्र मानस बदलण्यासाठी जी उणीव आहे, ती भरून निघत नाही, तोपर्यंत देश बदलणार नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
नेता कसा असावा हे सांगताना ते म्हणाले, शुद्ध, आचार-विचार आणि निष्कलंकित नेता असावा. तरच देशाचा खऱ्याअर्थाने विकास होईल. आचार-विचार नसलेल्या नेतृत्वाकडून कधीही देशाचा विकास, भले होऊ शकत नाही. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. त्यामुळे तिला सक्षम ठेवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यांच्यात देशसेवेचे संस्कार रुजविले पाहिजेत. ते म्हणाले, शिवाजीराव देशमुख यांच्यासारखा नेता, आनंद पाटील, विश्वास नांगरे-पाटील यांच्यासारखे अधिकारी असतील, तर हा देश खूप पुढे जाईल.
तामिळनाडू गृहनिर्माणचे व्यवस्थापकीय संचालक आनंद पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. राजश्री आनंद पाटील यांची ईडीआयआयच्या (भारतीय उद्योजकता विकास संस्था) संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांना वारणा क्रांतिजोती पुरस्कार व आबा फौंडेशनच्यावतीने नारायण नांगरे आबा स्मृती वारणेचा वाघ कुस्ती पुरस्कार महाराष्ट्र केसरी अभिजित कटके यांना, तसेच विकास नांगरे यांना वारणा कृषिरत्न पुरस्कार मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी फत्तेसिंगराव देशमुख, संपतराव देशमुख, बाळासाहेब पाटील, अनिलराव देशमुख, बाजार समिती सभापती सुजित देशमुख, आबा फौंडेशनच्या अध्यक्षा रुपाली नांगरे-पाटील, सरपंच विलास वाघमारे, उपसरपंच नंदकुमार पाटील, श्रीरंग नांगरे, प्रा. ए. सी. पाटील, गजानन घोडे, सुनील पाटील, पोपट पाटील, सुहास पाटील, मोहन पाटील, अंकुश नांगरे, रमेश पोतदार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सत्यम शिवम सुंदरम हा भावगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. संपतराव देशमुख यांनी स्वागत व प्रस्ताविक, तर बाबासाहेब परीट व संजय घोडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा ए. सी. पाटील यांनी आभार मानले.