प्रबाेधनकारांच्या यादीत अण्णा भाऊ साठेंचा समावेश नाही, वाटेगावात बंद पाळून केंद्र सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 02:30 PM2022-01-06T14:30:25+5:302022-01-06T14:56:36+5:30
वाटेगाव : केंद्र सरकारने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचा समावेश प्रबोधनकारांच्या यादीत न केल्याने अण्णा भाऊंच्या मूळ ...
वाटेगाव : केंद्र सरकारने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचा समावेश प्रबोधनकारांच्या यादीत न केल्याने अण्णा भाऊंच्या मूळ गावात वाटेगाव (ता. वाळवा) येथे काल, बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. कोरोनाचे सर्व नियम पाळून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे राज्य अध्यक्ष सुधाकर भालेराव यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचा केंद्रस्तरीय प्रबाेधनकारांच्या यादीत समावेश करण्याची मागणी केली हाेती. यावर भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचे सचिव विकास त्रिवेदी यांनी पत्र पाठवून अण्णा भाऊंचे नाव या यादीत समाविष्ट करण्यात येत नसल्याचे भालेराव यांना कळवले आहे. याची माहिती मिळाल्यानंतर वाटेगाव येथे अण्णा भाऊंच्या स्मारकासमोर निषेध करण्यात आला. बुधवारी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती रवींद्र बर्डे, सरपंच सुरेश साठे, उपसरपंच शुभांगी पाटील, माजी सरपंच प्रकाश पाटील, फकिरा साठे, विनोद जाधव यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी प्रतिभा ऐतवडेकर, जनार्दन साठे, आण्णा खोत, संदीप साठे, योगेश साठे, किरण साठे, सतीश साठे, दिनेश जाधव उपस्थित होते.
सायंकाळी मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने गावातील प्रमुख मार्गावरून निषेध फेरी काढण्यात आली. यावेळी सूरज साठे, योगेश साठे, आशिष जाधव यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. गावात दिवसभर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.