अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ जाहीर करावे : के. चंद्रशेखर राव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 12:54 PM2023-08-02T12:54:52+5:302023-08-02T12:55:08+5:30
अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य शोषित, वंचित आणि कष्टकऱ्यांची व्यथा-वेदना मांडणारे
इस्लामपूर/वाटेगाव (सांगली) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य शोषित, वंचित आणि कष्टकऱ्यांची व्यथा-वेदना मांडणारे होते. त्यामुळेच त्यांना लोकशाहीर ही पदवी मिळाली. रशियन महासत्तेने त्यांना भारताचा ‘मॅक्सिम ग्रॉर्की’ असे संबोधले होते. अण्णाभाऊंसारख्या महान व्यक्तिमत्त्वाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करावा, असे आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केले.
वाटेगाव (ता. वाळवा) येथे के. सी. आर. यांच्या भारत राष्ट्र समितीच्यावतीने अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता. यावेळी राव यांनी स्मारकातील अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. अण्णाभाऊंच्या स्नुषा सावित्रीबाई साठे अध्यक्षस्थानी होत्या.
मुख्यमंत्री राव म्हणाले, अण्णाभाऊंनी समाजवाद आणि साम्यवादाची सांगड घालत भांडवलशाही व्यवस्थेवर प्रहार केले. त्यांचे साहित्य वैश्विक दर्जाचे होते. रशियन सरकारने त्यांना बोलावून घेत त्यांचा सन्मान केला. मात्र, भारतात त्यांचा सन्मान झाला नाही, याची खंत वाटते. महाराष्ट्र सरकारने अण्णाभाऊंच्या साहित्याचा इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद करावा.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी. तेलंगणा सरकारसुद्धा असा प्रस्ताव पाठवेल. मी व्यक्तीश: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करून अण्णाभाऊंना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा यासाठी पाठपुरावा करेन. देशाचा मूल निवासी असलेल्या राज्यातील मातंग समाजाला बीआरएसकडून योग्य ते प्रतिनिधित्व देऊ.
सचिन साठे म्हणाले, राज्यातील मातंग समाजाची अवस्था वाईट आहे. आमच्या समाजाचा वापर करून अनेकांनी आपला राजकीय उद्धार करून घेतला. आता केसीआर यांचे नेतृत्व मिळाल्याने मातंग समाजाच्या प्रगतीची दारे खुली झाली आहेत. मातंग समाजाला विधानसभेत आणि लोकसभेत योग्य ते प्रतिनिधित्व मिळावे. यावेळी राज्यप्रमुख शंकर धोंडगे, कबीर मौलाना, बी. जी. देशमुख, भगीरथ भालके, माजी खासदार हरीभाऊ राठोड यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
९ ऑगस्टला इस्लामपुरात मेळावा
राज्यातील शेतकरी चळवळीतील अभ्यासू नेते आणि देशभरातील शेतकरी संघटनांच्या शिखर संस्थेचे (सिफा) राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मंगळवारी साखराळे (ता. वाळवा) येथील आपल्या निवासस्थानी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. यावेळी पाटील यांनीही ९ ऑगस्ट रोजी इस्लामपूर येथे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत जाहीर मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले.