जन्मशताब्दीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांचे दर्जेदार स्मारक : सुरेश खाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:11 PM2019-07-29T12:11:14+5:302019-07-29T12:11:43+5:30
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष ऑगस्टपासून सुरू होत आहे. यानिमित्त वर्षभर विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म वाळवा तालुक्यातील वाटेगावचा असल्याने त्यांच्या दर्जेदार स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी येथे दिली.
सांगली : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष ऑगस्टपासून सुरू होत आहे. यानिमित्त वर्षभर विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म वाळवा तालुक्यातील वाटेगावचा असल्याने त्यांच्या दर्जेदार स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी येथे दिली.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त नियोजन व पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, सांगली - मिरज - कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर संगिता खोत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, वाळव्याचे उपविभागीय अधिकारी नागेश पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण सचिन कवले, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, समाजकल्याण अधिकारी सचिन साळे, वाटेगावचे सरपंच सुरेश साठे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
सुरेश खाडे म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाने वाटेगाव मधील मागासवर्गीय वस्त्यांचा विकास करण्यासाठी जवळपास 1 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच, यापूर्वी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या स्थळांचा विकास करण्यासाठी 28 ठिकाणे, स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील कवलापूर आणि वाटेगावचा समावेश आहे. वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी यापूर्वीच जवळपास 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापुढेही निधीची कमतरता पडू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
अण्णाभाऊ साठे राहत असलेल्या मुंबईतील निवासस्थानीही त्यांचे भव्य स्मारक उभा करण्यात येणार असल्याचे सांगून सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील जन्म असल्याने अण्णाभाऊ साठे यांचे जिल्ह्यात एक दर्जेदार स्मारक उभा करण्यासाठी जागा निश्चिती करून, प्रस्ताव सादर करावा. या स्मारकाच्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, सुसज्ज ग्रंथालय, केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींसाठी अभ्यासिका आदिंचा समावेश असावा. याचबरोबरच संस्था, संघटना आदिंकडून येणाऱ्या सूचनांचाही विचार केला जाईल, असे ते म्हणाले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगून सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मदिनी दि. 1 ऑगस्ट रोजी त्यांचे जन्मस्थळ वाटेगाव आणि मिरज येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगिता खोत यांनी मौलिक सूचना केल्या. स्वागत अविनाश देवसटवार यांनी केले. तर आभार सचिन कवले यांनी मानले.