इस्लामपूरची अन्नपूर्णा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:36 AM2018-10-18T00:36:58+5:302018-10-18T00:37:23+5:30
’ युनूस शेख, इस्लामपूर समाधानाचा जन्म स्वयंपाक घरात होतो. सर्वांच्या आवडीनिवडी सांभाळून सुग्रास भोजन करुन घालणे व सर्वांना ...
’ युनूस शेख, इस्लामपूर
समाधानाचा जन्म स्वयंपाक घरात होतो. सर्वांच्या आवडीनिवडी सांभाळून सुग्रास भोजन करुन घालणे व सर्वांना संतुष्ट करणे हा सुखी व समाधानी जीवनाचा कानमंत्र आहे. नवनवीन रेसिपी करण्याची आवड आज सवितातार्इंना शंभरहून अधिक मुलींची माय होण्याचं भाग्य देवून गेली आहे. सविता मनोज करळे हे या अन्नपूर्णेचे नाव.
इस्लामपूर येथील वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या विविध विद्याशाखांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींसाठी सविताताई या सुगरणच बनल्या आहेत. त्यांना लहानपणापासूनच स्वयंपाकाची छान आवड होती. घरीच नवनवीन रेसिपी करताना त्या सहज सुलभपणे उत्तम पदार्थ बनवू लागल्या. आपल्या या आवडीला त्यांनी व्यावसायीक रुप देण्याचा मनोदय पती मनोज करळे यांना बोलून दाखवला. सासूबाई विमल पांडुरंग करळे यांनी त्यांच्या धडाडीच्या निर्णयाला क्षणात संमत्ती दिली. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून सुरु असलेल्या मेसच्या व्यवसायाला प्रगतीचे पंख लाभले आहेत.
सकाळी ६ वाजता पाच महिला सहकाºयांसह सुरु होणारा सवितातार्इंचा दिवस रात्री ९ वाजता संपतो. सकाळचा नाष्टा, दोन वेळचा चहा, दोन वेळेचे जेवण असा राबता या मेसमधील मुलींसाठी सुरु असतो. सविताताई या उद्यमशील कुटुंबातील असल्याने मेसमधील जेवण बनविण्याच्या सर्व प्रक्रियेत त्या लक्ष ठेवून असतात. त्यांच्या सूचनेनुसार साहित्य घेवून महिला आचारी जेवण बनवितात.
या शिक्षण संस्थेमध्ये शास्त्र शाखेसह आर्कीटेक्ट इंजिनिअरींग, फार्मसी, बी. बी. ए., बी. सी. ए. अशा शिक्षणासाठी धुळे, नंदुरबार, बीड, नागपूर अशा लांबच्या जिल्ह्यासह परिसरातील मुली निवासी आहेत. त्यांच्या आवडी बघून सविताताई त्यांच्या चविचं जेवण देतात. मुलीही आपण आपल्याच घरी आहोत या भावनेतून स्वत:चे जेवण स्वत:च वाढून घेतात.
मेसमधे डालडा, सोडा आणि मैदा हे तीन पदार्थ वापरण्यावर त्यांनी पहिल्यापासूनच निर्बंध घातला आहे. जेवण बनविण्याची स्वत:ची आवड आणि कुटुंबाला हातभार लावावा या भावनेतून गेल्या पाच वर्षांपासून दिवसाकाठी २५0 मुलींचे पालनपोषण सविताताई करत आहेत. त्यांच्या बरोबर राबणाºया ५ सहकारी महिलांनाही त्या महिन्याकाठी ७ ते १३ हजार रुपयांपर्यंतचे वेतन देवून त्यांच्याही संसारात सुखाचे क्षण सविताताई पेरतात.