इंदिरा गांधी विद्यापीठातील ज्योतिषशास्त्राचा अभ्यास मागे घेण्याची अंनिसची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 08:11 PM2021-06-26T20:11:32+5:302021-06-26T20:13:44+5:30
Astrology Sangli : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) यावर्षीपासून सुरु केलेला ज्योतिष अभ्यासक्रम रद्द करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. अशास्त्रीय गोष्टींच्या प्रशिक्षणाचा दावा करणारा हा अभ्यासक्रम समाजासाठी घातक असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.
सांगली : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) यावर्षीपासून सुरु केलेला ज्योतिष अभ्यासक्रम रद्द करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. अशास्त्रीय गोष्टींच्या प्रशिक्षणाचा दावा करणारा हा अभ्यासक्रम समाजासाठी घातक असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.
अंनिसने सांगितले की, ज्योतिषाला कोणताही शास्त्रीय आधार नाही. ते एक छद्म विज्ञान आहे. खगोलशास्त्राच्या अभ्यासानुसार ग्रह, गोल, ताऱ्यांचा मानवी जीवनावर कोणताही प्रभाव पडत नाही. त्यामुळे ज्योतिष अभ्यासक्रम तातडीने रद्द करावा. २००१ मध्ये वाजपेयी सरकारनेही या अभ्यासक्रमाचा निर्णय घेतला होता. प्रचंड विरोधामुळे मागे घेतला होता.
डॉ. जयंत नारळीकर यांच्यासह अनेक जेष्ठ खगोल वैज्ञानिकांनी याला विरोध केला होता. जेष्ठ वैज्ञानिक जेम्स रॅन्डी यांनी ज्योतिषांच्या जगाच्या अंताविषयीच्या ५० दाव्यांचा फोलपण सिद्ध केला होता. नोबेल विजेते व्ही. वेंकटरामन यांनीही ज्योतिषाची तुलना छद्मविज्ञानाशी केली आहे.
अंनिसने सांगितले की, इग्नूच्या अभ्यासक्रमातून चंद्रग्रहण, सूर्यग्रहण अशा खगोलीय घटनांविषयी अज्ञान आणि भीती पसरली जात आहे. ज्योतिषविषयक गैरसमज दूर करणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश असताना मुक्त विद्यापीठाने असा अभ्यासक्रम सुरु करणे हे आक्षेपार्ह आहे. कोरोनामध्ये विज्ञानवादी मानसिकतेचे महत्व अधोरेखित झाले आहे, अशावेळी अशास्त्रीय गोष्टीना उत्तेजन देण्याचे शासनाने टाळायला हवे.
अंनिसचे प्रा. प. रा. आर्डे, प्रशांत पोतदार, नंदिनी जाधव, केदारनाथ सुरवसे, चंद्रकांत उळेकर, कमलाकर जमदाडे, भगवान रणदिवे, राहुल थोरात, फारुख गवंडी, वाघेश साळुंखे, स. नि. पाटील, डॉ. संजय निटवे, इब्राहिम नदाफ यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे.
वैज्ञानिकांचे निवेदन देणार
अंनिसतर्फे देशभरातील प्रमुख २५ वैज्ञानिक आणि शिक्षणतज्ज्ञांच्या सह्यांचे निवेदन मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर ह्यांना देण्यात येणार आहे. इग्नूमधील ज्योतिष अभ्यासक्रम रद्द करण्याची मागणी त्याद्वारे केली जाणार आहे असे अंनिसने सांगितले.