कोरोना लसीमुळे शरीरात चुंबकत्व तयार होत नसल्याचे अंनिसचे स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 05:46 PM2021-06-11T17:46:13+5:302021-06-11T17:49:33+5:30
Corona vaccine Sangli : कोव्हिशिल्ड लस टोचून घेतल्यावर शरिरात चुंबकत्व तयार होत असल्याचे खोटे आहे, या अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलनच्या सत्यशोधन समितीने केले आहे.
संतोष भिसे
सांगली : कोव्हिशिल्ड लस टोचून घेतल्यावर शरिरात चुंबकत्व तयार होत असल्याचे खोटे आहे, या अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलनच्या सत्यशोधन समितीने केले आहे.
समितीने प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की, कोव्हिशिल्डची लस रक्ताद्वारे शरीरात पसरते. लसीमुळे चुंबकत्व निर्माण होत असल्यास संपूर्ण शरीरात व्हायला हवे, पण सध्या व्हायरल होत असणाऱ्या चित्रफितींत फक्त हातालाच चुंबकत्व येत असल्याचे दिसते.
दंडाच्या आसपास लोखंडी अथवा स्टीलच्या हलक्या वस्तू चिकटलेल्या दिसतात. असा दावा करणाऱ्या व्यक्तीने अंगावर काही वस्तू लपवल्या नसल्याची खात्री केली पाहिजे. वस्तुंना कोणताही चिकट पदार्थ लावला नाही ना ? हेदेखील तपासले पाहिजे. तसेच हा प्रयोग चिकित्सक तज्ज्ञांसमोर करायला हवा. संबंधित व्यक्तीने चुंबक शरिरावर बाळगल्याची शक्यता नाकारता येत नाही.
समितीने सांगितले की, कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या सर्वच लाभार्थ्यांच्या शरिरात चुंबकत्व निर्माण व्हायला हवे, पण तसे झाल्याची उदाहरणे नाहीत. त्यामुळे लस घेतल्याने चुंबकत्व आल्याची कथा असत्य वाटते. चुंबकत्व निर्माण झाल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने व त्यांच्या कुटूंबियांनी परवानगी दिल्यास सत्यता पडताळण्याची अंनिसची तयारी आहे. अंनिसच्या राज्य बुवाबाजी संघर्ष समितीचे सदस्य प्रशांत पोतदार, नंदिनी जाधव, केदारीनाध सुरवसे, भगवान रणदिवे, कमलाकर जमदाडे मिलिंद देशमुख यांनी हा खुलासा केला आहे.
स्टेनलेस चुंबकाला कसे चिकटेल?
स्टेनलेस स्टील चुंबकाला चिकटत नाही. फक्त लोखंडी वस्तूच चिकटतात. चित्रफितीत सर्व वस्तू स्टेनलेस स्टीलच्या दिसत आहेत. याचा अर्थ चुंबकीय आकर्षणामुळे वस्तु चिकटत नसून त्यामागे अन्य कारणे असल्याचे स्पष्ट होते असे अंनिसने म्हंटले आहे.