सांगली : मंत्राने पाणी गोड करणाऱ्या गुजरातच्या डॉक्टरांना अंनिसचे आव्हान
By संतोष भिसे | Published: April 14, 2023 06:06 PM2023-04-14T18:06:15+5:302023-04-14T18:14:47+5:30
मंत्रांच्या प्रभावाने पाणी गोड करण्याचा दावा करणाऱ्या डॉ. अमरेश मेहता यांना अंनिसने आव्हान दिले आहे.
सांगली : मंत्रांच्या प्रभावाने पाणी गोड करण्याचा दावा करणाऱ्या डॉ. अमरेश मेहता यांना अंनिसने आव्हान दिले आहे. अशा आधुनिक मांत्रिकांचा शासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.
गुजरातमधील डॉ. मेहता रविवारी (दि. १६) इनाम धामणी (ता. मिरज) येथे मंत्रांच्या सामर्थ्याने विविध प्रयोग दाखवणार आहेत. पॉवर ऑफ मंत्रा असे कार्यक्रमाचे नाव आहे. मंत्राद्वारे साधे पाणी गोड करणे, दूर अंतरावरी पापड मोडणे असे प्रयोग करणार आहेत. मंत्रांच्या शक्तीने अनेक आजारही बरे होतात असा त्यांचा दावा आहे.
त्यांना अंनिसने आक्षेप घेतला आहे. हे दावे अवैज्ञानिक दावे असून मंत्र-तंत्र विद्या ही अवैज्ञानिक संकल्पना आहे असे अंनिसने स्पष्ट केले. डाॅ. प्रदीप पाटील म्हणाले की, मंत्रांत कोणतेही सामर्थ्य नसते. डॉ. मेहता यांनी मंत्रांचे सामर्थ्य सिद्ध करावे. मानवी देहाभोवती आभामंडळ असते हा दावाही सिद्ध करुन दाखवावा. मंत्रसामर्थ्याने अपत्यप्राप्ती होते हेदेखील सिद्ध करावे. मंत्रांच्या सामर्थ्यावर खुली चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. त्यांनी त्यांच्या कार्यक्रमात आम्हाला संधी द्यावी.
राहुल थोरात म्हणाले, कोणत्याही धर्माला आमचा विरोध नसून धर्माच्या नावाने अवैज्ञानिकता पसरविणास विरोध आहे. डाॅ. संजय निटवे म्हणाले, शरीरात सात चक्रे असतात याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.
ॲड. धनंजय मद्वान्ना, ॲड. अजित सूर्यवंशी म्हणाले, अशा आधुनिक मांत्रिकांवर शासनाने कठोर कारवाई करावी. रुग्णांच्या जीवाशी खेळ थांबवावा.
यावेळी बाळासाहेब पाटील, जगदीश काबरे, ज्योती आदाटे, त्रिशला शहा, आशा धनाले, तेजस्विनी सूर्यवंशी, प्रियांका तुपलोंढे, फारुख गवंडी आदी उपस्थित होते.
टक्केवारी वाढते, आवडती व्यक्ती जवळ येते
डॉ. मेहता यांनी चित्रफितींद्वारे मंत्रसामर्थ्याचे अनेक दावे केले आहेत. प्रजनन समस्या, नि:संतानता, त्वचारोग, गर्भरक्षा, काळी जादू व नजर लागणे आदी कारणांसाठी मंत्रांची ताकद वापरता येते असा त्यांचा दावा आहे. आवडत्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठीचा मंत्रही त्यांच्याकडे आहे. मंत्र म्हंटल्याने परीक्षेची टक्केवारी वाढते, ५० टक्के गुण मिळविणारे ९० टक्क्यांपर्यंत जातात, स्मरणशक्ती वाढते, मतिमंदांची बुद्धी ८० टक्के सुधारते, उच्च रक्तदाब नियंत्रित होतो, थायरॉईड ठिक होतो असेही अनेक दावे त्यांनी केले आहेत.