३५ सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या जाहीर

By admin | Published: December 28, 2015 12:01 AM2015-12-28T00:01:18+5:302015-12-28T00:26:29+5:30

जानेवारीत मतदान : जिल्हा सहकार बोर्डाचाही समावेश

Announced for the election of 35 co-operative institutions | ३५ सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या जाहीर

३५ सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या जाहीर

Next

सांगली : डिसेंबरअखेर निवडणुकीस पात्र असणाऱ्या जिल्ह्यातील ३५ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. जानेवारी महिन्यात होणाऱ्या या निवडणुकांमध्ये जिल्हा सहकारी बोर्डासह ब गटातील अन्य महत्त्वाच्या संस्थांचा समावेश आहे.
संचालक मंडळाच्या २०१५-१६ ते २०१९-२० या पंचवार्षिक कालावधीसाठी या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. २८ डिसेंबर २०१५ ते २ फेब्रुवारी २०१६ पर्यंत या सर्व निवडणुका घेतल्या जात आहेत. या सर्व निवडणुका ब गटातील सहकारी संस्थांच्या आहेत. यातील बहुतांश संस्थांसाठी २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधित मतदान घेऊन त्या-त्या दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे. जिल्हा सहकारी बोर्डाच्या १९ जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातील सहकारी संस्थांचा प्रत्येकी १ याप्रमाणे १० सदस्य, जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या संस्थेचा १ प्रतिनिधी, व्यक्तिगत सभासद प्रतिनिधी २, आजीव सभासद प्रतिनिधी १, महिलांसाठी राखीव प्रतिनिधी २, अनुसूचित जाती, जमाती प्रतिनिधी १, विमुक्त भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गासाठी १ आणि इतर मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून १ अशा १९ जागांचा समावेश आहे.
सहकार बोर्डासाठी सहायक निबंधक अमित गराडे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २८ डिसेंबर ते १ जानेवारी २०१३ पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. २ जानेवारीस दाखल अर्जांची छाननी केली जाणार असून, ४ जानेवारीस वैध अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ४ ते १८ जानेवारी या कालावधित उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. १९ जानेवारीस चिन्हांचे वाटप होणार आहे. त्यानंतर थेट ३१ जानेवारीस मतदान होणार आहे. त्याचदिवशी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे.
जिल्हा सहकारी बोर्ड ही एक महत्त्वाची संस्था असून, या निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण बिगरशेती, पगारदार, सेवक पतसंस्था व औद्योगिक सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे त्या-त्या गावात आणि तालुक्यात आता पुन्हा पक्षीय स्तरावर वर्चस्वाची लढाई रंगणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Announced for the election of 35 co-operative institutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.