यंदाचे विष्णुदास भावे गौरव पदक मोहन आगाशे यांना जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 08:05 PM2018-10-05T20:05:01+5:302018-10-05T20:05:30+5:30
अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने देण्यात येणारे विष्णुदास भावे गौरव पदक यंदा ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना जाहीर झाले आहे.
सांगली : येथील अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने देण्यात येणारे विष्णुदास भावे गौरव पदक यंदा ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना जाहीर झाले आहे. रंगभूमीदिनी (दि. ५ नोव्हेंबर) अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्याहस्ते ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.
दरवर्षी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणा-या ज्येष्ठ कलाकारास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात येते. मराठी नाट्यक्षेत्रातील सर्वात मानाचा पुरस्कार म्हणून या पुरस्काराकडे पाहिले जाते. विष्णुदास भावे गौरव पदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पंचवीस हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. कराळे यांनी सांगितले की, डॉ. मोहन आगाशे यांची कारकीर्द मोठी असून एमबीबीएसच्या शिक्षणानंतर त्यांनी मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. लहानपणापासूनच त्यांनी सई परांजपे यांच्या बालनाट्यात काम करायला सुरुवात केली. पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा गाजवल्यानंतर १९५८ ला त्यांनी पुण्यातील प्रोग्रेसिव्ह ड्रामाटिक असोसिएशनच्या नाटकांमधून लक्ष वेधून घेतले. ‘अशी पाखरे येती’ या नाटकावेळीच ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी त्यांना मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेल्या विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ नाटकातील नाना फडणवीसांची भूमिका दिली.
या व्यक्तिरेखेमुळे त्यांचे नाव सर्वदूर झाले. या नाटकाचे त्यांनी सलग २० वर्षे देश-परदेशात आठशेहून अधिक प्रयोग केले. धन्य मी कृतार्थ मी, तीन पैशाचा तमाशा, बेगम बर्वे, तीन चोक तेरा, वासांशी जीर्णानी, सावर रे यासह इतर नाटकांतही काम केले. अलीकडे ‘काटकोन त्रिकोण’ या नाटकाचेही त्यांनी अडीचशेवर प्रयोग केले आहेत. ‘सामना’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर जैत रे जैत, सिंहासन, एक होता विदूषक, देवराई, वळू, विहीर या मराठी चित्रपटांबरोबरच निशांत, आक्रोश, मशाल, मृत्युदंड, गंगाजल, अपहरण, रंग दे बसंती या हिंदी चित्रपटातही त्यांच्या भूमिकांना रसिकांसह समीक्षकांची पसंती मिळाली. बारामती येथे झालेल्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी एक हजार भूकंपग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन केले आहे.
आजवरचे पुरस्काराचे मानकरी...
आतापर्यंत भावे गौरव पुरस्काराने बालगंधर्व, केशवराव दाते, आचार्य अत्रे, भालचंद्र पेंढारकर, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, प्रभाकर पणशीकर, शरद तळवलकर, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, दिलीप प्रभावळकर, अमोल पालेकर, मोहन जोशी, विक्रम गोखले, जयंत सावरकर यांच्यासह अनेक ख्यातनाम रंगकर्मींना गौरविण्यात आले आहे. बालरंगभूमीकडे अभिनव दृष्टीने पाहणारी व वेगळ्या पध्दतीने मुलांची नाटके सादर करणा-या ‘ग्रिप्स’ चळवळीचा परिचय त्यांनी भारतीय रंगभूमीला करून दिला.
डॉ. मोहन आगाशे यांना सांस्कृतिक प्रकल्पासाठी जर्मन सरकारने २००२ मध्ये ‘क्रॉस आॅफ आर्डरर मेरीट’ आणि मार्च २००४ मध्ये ‘गटे’ पदकाने सन्मानित करण्यात आले. १९९० च्या जानेवारी महिन्यात त्यांना भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’ देऊन गौरविण्यात आले. याशिवाय १९९१ मध्ये ‘नंदीकर’ पुरस्कार, १९९६ मध्ये संगीत नाटक अकादमी, १९९८ मध्ये ‘पुणे प्राईड’ असे विशेष पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.