सरकारी कर्मचाऱ्यांचा वार्षिक सभेत गोंधळ
By admin | Published: July 20, 2014 11:33 PM2014-07-20T23:33:01+5:302014-07-20T23:44:22+5:30
‘सॅलरी’ची सभा : नोकरभरतीसह सर्व ठराव बहुमताने मंजूर; सत्ताधाऱ्यांवर विरोधकांची टीका
सांगली : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सॅलरी अर्नर्स सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यंदाही प्रचंड गोंधळ झाला. गोंधळातच सत्तारुढ गटाने ‘मंजूर...मंजूर’, अशा घोषणा देत नोकरभरतीसह सर्व ठराव मंजूर केले. सत्ताधारी गटाने कोणालाही बोलण्याची संधी न देता ही सभा गुंडाळल्याचा आरोप विरोधकांनी केला.
येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात दि सॅलरी अर्नर्स सोसायटीची १०२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप कदम होते. सहकार कायदा कलम ८९ नुसार संस्थेच्या कारभाराची चौकशी झाली असून, त्यात अनियमिततेबरोबर अनेक आक्षेप नोंदविण्यात आले आहेत, अशी टीका सभेपूर्वीच छोटुराव देशमुख, बी. बी. लाड, तात्या कुलकर्णी, नंदू ढोबळे, बजरंग कदम, दिलीप शिंदे यांनी केली होती. यामुळे सभेत गोंधळ होण्याची शक्यता गृहित धरुन पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
संस्थेचे अध्यक्ष प्रदीप कदम यांनी स्वागत केल्यानंतर सत्तारूढ व विरोधी सदस्यांकडून गोंधळास प्रारंभ झाला. प्रथम प्रश्नोत्तरे घेण्यात यावीत, अशी मागणी बजरंग कदम यांनी केली. मात्र याला सत्तारुढ गटाने विरोध करुन, नियोजित पध्दतीनेच सभेचे कामकाज करण्यात येईल असे स्पष्ट केले. यानंतर काही विरोधी सदस्यांनी सभात्याग केला.
यानंतर राखीव निधी, मृत फंड, कल्याण निधी, विद्यार्थी बक्षीस योजना, जीवन रक्षक निधी, विमा क्लेम, ठेव तारण कर्जे आदी ठरावांना मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर पोटनियम दुरुस्ती, लेखापरीक्षक नेमणे, नवीन नोकर भरतीसाठीही सभेची मान्यता घेण्यात आली. सभागृहात गोंधळ सुरू असतानाच ठरावांना मंजुरी दिली जात होती. एकीकडे मंजूर, तर दुसरीकडे नामंजूर अशा घोषणा सुरूच राहिल्या. सभासदांसाठी ठेवण्यात आलेला ध्वनिक्षेपकाचा ताबा घेण्यासाठी सत्तारुढ व विरोधकांमध्ये झटापट झाली. विरोधकांनी शेवटी सभागृहातून बाहेर पडणेच पसंत केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मलगोंडा कोरे, संचालक सदाशिव सूर्यवंशी, सौ. सुचेता हरळीकर, सौ. सुमन थोरात, अरुण गायकवाड, सुनील ढाले, सत्तारुढ गटाचे नेते डी. जी. मुलाणी, पी. एन. काळे, इकबाल मुलाणी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
--संस्थेची बदनामी करुन ठेवीदारांमध्ये घबराट निर्माण केल्याबद्दल विरोधी गटात गेलेले संचालक सुकुमार पाटील, रामराव मोडे यांच्यासह सभासद छोटुराव देशमुख, बी. बी. लाड, तात्या कुलकर्णी, नंदू ढोबळे, बजरंग कदम आदींना नोटिसा पाठविण्यासही सभेत मान्यता घेण्यात आली. त्यांना रितसर नोटिसा पाठवून विशेष सभा बोलावून त्यांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव करण्यात येईल, अशी माहिती अध्यक्ष प्रदीप कदम यांनी दिली.
--सत्तारुढ गटाने गोंधळ घालून केवळ अर्ध्या तासातच सभा गुंडाळल्याचा आरोप विरोधक छोटुराव देशमुख, नंदू ढोबळे, बजरंग कदम, तात्या कुलकर्णी आदींनी केला. विरोधकांना बोलू दिले नाही, ध्वनिक्षेपक दिला नाही, प्रश्न विचारण्यास गेले असता गोंधळ घालून त्यांना रोखण्यात आले. सभासदांचा हक्क आजच्या सभेत डावलण्यात आल्याचे ते म्हणाले. सत्तारुढ गटाचे नेते डी. जी. मुलाणी म्हणाले की, पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधकांची धडपड ही केविलवाणी होती. त्यांच्याकडे कोणताही नवा मुद्दा नव्हता. जुन्याच प्रश्नांना ते ऊत आणत होते.