अबब! किती झाला हा विकास!, सांगलीचे जणू सिंगापूर होणार; निवडणुकांच्या तोंडावर नेत्यांच्या घोषणा

By संतोष भिसे | Published: July 12, 2023 05:36 PM2023-07-12T17:36:25+5:302023-07-12T17:37:29+5:30

खासदार म्हणतात, महामार्ग लॉजिस्टिकतर्फे ड्रायपोर्ट

Announcement of development projects in Sangli district ahead of elections | अबब! किती झाला हा विकास!, सांगलीचे जणू सिंगापूर होणार; निवडणुकांच्या तोंडावर नेत्यांच्या घोषणा

अबब! किती झाला हा विकास!, सांगलीचे जणू सिंगापूर होणार; निवडणुकांच्या तोंडावर नेत्यांच्या घोषणा

googlenewsNext

संतोष भिसे

सांगली : निवडणुकांच्या तोंडावर जिल्ह्यात विकास प्रकल्पांचे नगारे जोरजोराने वाजू लागले आहेत. गेली चार वर्षे येणार येणार म्हणून गाजत असलेले कोट्यवधी रुपये किमतीचे प्रकल्प नेत्यांच्या तोंडून आता धडाधड सांगलीकरांच्या सेवेत रुजू होत आहेत. हे सारे प्रकल्प प्रत्यक्षात साकारले, तर सांगलीचे सिंगापूर होण्यास वेळ लागणार नाही, असा भाबडा आशावाद नागरिक बाळगून आहेत.

निवडणुकांसाठी जेमतेम वर्षभराचा कालावधी उरला आहे. सन २०२४ च्या दिवाळीत नवे लोकप्रतिनिधी येतील. त्याची आचारसंहिता जुलै-ऑगस्टमध्येच लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या विकासाचा कैवार घेणाऱ्या अनेक वार्ता थेट दिल्ली-मुंबईतून सांगलीच्या वेशीवर धडकत आहेत. विकासाच्या शर्यतीत मागे पडण्याच्या भीतीने नेतेमंडळी परस्परांवर कुरघोडी करू पाहत आहेत. पण, ड्रायपोर्टसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा फुगा अचानक फुटल्याने नेत्यांबरोबर जनताही अस्वस्थ झाली आहे.

गेली चार-आठ वर्षे रांजणीच्या वैराण माळावर ड्रायपोर्टच्या गावगप्पांचे पीक जोमाने पिकले. कवठेमहांकाळ तालुक्याचा कॅलिफोर्निया करण्याची स्वप्ने नेत्यांनी पेरली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही स्वप्नांच्या महालामध्ये पायाची वीट ठेवली. ड्रायपोर्टशेजारी महामार्गावर थेट विमान उतरविण्याचे स्वप्न दाखविले. पण, गेल्या महिनाभरात हे विमान सलगरेच्या माळाकडे वळले. सलगरेच्या ३५० एकर माळावर ड्रायपोर्टमधून शेकडो कंटेनरची चढ-उतार होत असल्याचे स्वप्न अख्ख्या जिल्ह्याने पाहिले. इतक्यात जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथाॅरिटीने स्वच्छ पत्र लिहून नेत्यांना आणि सांगलीकरांनाही आरसा दाखविला. अवघ्या दहा ओळींत भ्रमाचा भोपळा फोडून टाकला.

खासदार म्हणतात, महामार्ग लॉजिस्टिकतर्फे ड्रायपोर्ट

‘जेएनपीए’ने सलगरेच्या ड्रायपोर्टवर फुली मारली असली, तरी खासदार संजय पाटील यांनी मात्र हार मानलेली नाही. महामार्ग प्राधिकरण लॉजिस्टिकतर्फे ड्रायपोर्ट होणार, असा दावा त्यांनी केला आहे. कोंबडा कोणाचाही असला, तरी जिल्ह्याला ड्रायपोर्टच्या सूर्योदयाची प्रतीक्षा आहे. नाहीतर, आहेच गाजराची पुंगी!

बघा या घोषणा...

निवडणुकीच्या तोंडावर नेतेमंडळींनी केलेल्या काही घोषणा पाहिल्या, तर सांगलीचे सिंगापूर व्हायला वेळ लागणार नाही, अशी भाबडी आशा बाळगायला हरकत नाही असेच वाटते.

  • सलगरे येथे ड्रायपोर्ट, नव्हे नव्हे, मल्टिलॉजिस्टिक पार्क
  • कवलापुरात विमानतळाला तत्त्वत: मंजुरी
  • जिल्ह्यात आयटी पार्कसाठी पुणेस्थित कंपन्यांच्या भेटी
  • म्हैसाळ योजना सौरऊर्जेवर चालविण्यासाठी १४०० कोटी, २०० मेगावॉटचा प्रकल्प
  • राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाचा सांगली-पेठ रस्ता
  • जिल्ह्यासाठी शक्तिपीठ आणि ग्रीनफिल्ड हे दोन नवे महामार्ग
  • जतच्या दुष्काळी भागाला पाण्यासाठी तुबची-बबलेश्वर योजना
  • जतच्या पूर्व भागातील ६४ गावांसाठी म्हैसाळ योजनेचा सहावा टप्पा, १९०० कोटींची तरतूद
  • सांगली, कोल्हापूरचा पूर टाळण्यासाठी कर्नाटक सरकारवर दबाव टाकण्याचे काँग्रेस नेत्यांचे आश्वासन

Web Title: Announcement of development projects in Sangli district ahead of elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.