सुदानमध्ये अडकलेले सांगली जिल्ह्यातील आणखी ३० जण भारतात परतले
By शरद जाधव | Published: May 5, 2023 07:53 PM2023-05-05T19:53:36+5:302023-05-05T19:54:35+5:30
सांगली जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहेत.
शरद जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क सांगली: आफ्रिका खंडातील सुदानमध्ये सुरू असलेल्या गृहयुध्दामुळे अडकून पडलेल्या जिल्ह्यातील आणखी ३० नागरिक भारतात परतले. दोनच दिवसांपूर्वी सातजण परतले होते. केंद्र सरकारच्या 'ऑपरेशन कावेरी' अंतर्गत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूपपणे परत आणले जात आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील नागरिक सुखरूपपणे परतले आहेत.
सांगली जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहेत. सुदानमध्ये विविध कारखान्यात कामासाठी जिल्ह्यातील १०० ते १२० नागरिक होते. गृहयुध्द सुरूच असल्याने या कामगारांनी भारतात परतण्याची मागणी केली होती. त्यानुसार केनाना शुगर फॅक्टरीत कामास असलेले कामगार आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने भारतीय दुतवासासोबत चर्चा केली होती. त्यानुसार केनाना मध्ये अडकलेल्या कामगारांना पोर्ट सुदानपर्यंत आणण्यासाठी सोय करण्यात आली. यानंतर रविवारी सातजण परतले होते. आता आणखी ३० जण परतल्याने नागरिकांनी शासनाचे आभार मानले. तिथे अडकलेल्या जिल्ह्यातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवता यावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करून त्यावर अधिकाऱ्यांची नियुक्तीही जिल्हा प्रशासनाने केली होती.