रुग्णालयाबाहेर फेकलेल्या दुसऱ्या रुग्णाचाही मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 04:23 AM2019-11-13T04:23:53+5:302019-11-13T04:23:59+5:30
मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या तीन रुग्णांना सांगलीतील निर्जन रस्त्यावर फेकून देण्यात आले होते.
सांगली : मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या तीन रुग्णांना सांगलीतील निर्जन रस्त्यावर फेकून देण्यात आले होते. यापैकी दुसºया रुग्णाचा मंगळवारी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ईर्शाद मोमीन असे मृत रुग्णाचे नाव आहे. यातील एका रुग्णाचा अगोदरच मृत्यू झाला आहे.
मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या तीन रुग्णांवर उपचार न करता त्यांना २ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास सांगलीतील जुना कुपवाड येथील निर्जन रस्त्यावर फेकण्यात आले होते. हा प्रकार समजताच त्या रुग्णांना शिवसेनेचे शंभोराज काटकर आणि संजयनगर पोलिसांनी उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. या तीन रुग्णांपैकी शिवलिंग कुचनुरे (गणेशवाडी, ता. शिरोळ) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता, तर दोघांवर उपचार सुरू होते. या प्रकरणी प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली होती. त्याचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात असतानाच दुसºया रुग्णाचा मृत्यू झाला. पोलीस मोमीन यांच्या नातेवाइकांचा शोध घेत आहेत. मोमीन यांचे मूळ नाव पिराजी खुडे असे असून, ते राऊतनगर (अकलूज) येथील रहिवासी असल्याचे समजते. या प्रकरणाविरोधात सामाजिक संघटना आक्रमक होताच रुग्णालय प्रशासनाने मिरज महात्मा गांधी पोलीस ठाण्यात दोघा कर्मचाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. यातील समाजसेवा अधीक्षक अनिल नरसिंगकर यास अटक करण्यात आली आहे, तर सफाई कामगार सागर साळोखे याचा शोध सुरू आहे.