म्हैसाळ भ्रूण हत्याप्रकरणी आणखी एकाला अटक
By admin | Published: March 15, 2017 12:21 PM2017-03-15T12:21:11+5:302017-03-15T12:21:11+5:30
म्हैसाळ येथील भ्रूण हत्या प्रकरणात बुधवारी मुख्य संशयित डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याला औषध पुरविणा-या भरत नावाच्या आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 15 - म्हैसाळ येथील भ्रूण हत्या प्रकरणात बुधवारी मुख्य संशयित डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याला औषध पुरविणा-या भरत नावाच्या आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील असून सध्या सांगलीतील बसस्थानक परिसरात रहात होता. दरम्यान, खिद्रापुरे याने रुग्णालयातील गर्भपाताशी संबंधित औषधे कृष्णा नदीत फेकून दिल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
म्हैसाळ भ्रूण हत्या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आतापर्यंत या प्रकरणात मुख्य संशयित खिद्रापुरे याच्यासह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. यात दोन डॉक्टर, चार एजंट, नर्स, कंपाऊंडर, औषध पुरवठा करणा-या इसमाचा समावेश आहे. मणेराजुरीतील विवाहित स्वाती जमदाडेचा गर्भपातावेळी मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. तिच्या पती प्रविण जमदाडे यालाही अटक झाली आहे. त्याच्याकडून बुधवारी मोटारसायकल जप्त करण्यात आली.
भ्रूणहत्येचे प्रकरण समोर येताच खिद्रापुरे गायब झाला होता. फरार होताना त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील औरवाड परिसरात रुग्णालयातील गर्भपाताशी संबंधित औषधे फेकल्याची कबुली दिली आहे. खिद्रापुरे याला औषध पुरविणा-या आणखी एकाचे नाव समोर आले असून त्याला अटक करण्यात आली. अटक केलेल्यांची संख्या बारा झाली आहे. भरत हा मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील असून सध्या तो सांगलीत राहतो. त्याची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.