सांगलीत आणखी एक पिस्तूल जप्त

By admin | Published: November 7, 2015 11:21 PM2015-11-07T23:21:18+5:302015-11-07T23:46:04+5:30

गुन्हेगार सातारचा : काडतुसे जप्त

Another pistol seized in Sangli | सांगलीत आणखी एक पिस्तूल जप्त

सांगलीत आणखी एक पिस्तूल जप्त

Next

सांगली : येथील गुंडाविरोधी पथकाने कोंडवे (जि. सातारा) येथे शुक्रवारी रात्री छापा टाकून शंकर शिवाजी चोरगे (वय २४, कोंडवे, जि. सातारा) या सराईत गुन्हेगारास अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्याची किंमत ८० हजार रुपये आहे. त्याला घेऊन पथक शनिवारी पहाटे सांगलीत दाखल झाले.
उत्तरप्रदेश राज्यातून सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात देशी बनावटीची पिस्तूल व काडतुसांची तस्करी करणाऱ्या सुनील रघुनाथ जयस्वाल (वय ३०, रा. रा. उत्तर प्रदेश, सध्या मुंबई) या तस्करास शुक्रवारी गुंडाविरोधी पथकाने पकडले होते. तो सांगलीच्या नवीन रेल्वे स्टेशन परिसरात संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला होता. त्याची अंगझडती घेतली असता, देशी बनावटीचे एक पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली होती. पश्चिम महाराष्ट्रात तो अनेकदा पिस्तूल विक्रीसाठी आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. कोंडवे येथील शंकर चोरगे याला दोन महिन्यापूर्वी पिस्तूल विकल्याची त्याने कबुली दिली होती. त्यामुळे पथक रात्रीच चोरगेच्या शोधासाठी गेले होते.
स्थानिक पोलिसांची मदत घेऊन त्यांनी मध्यरात्री चोरगेच्या घरावर छापा टाकला. छाप्याची चाहूल लागल्याने त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच त्यास कोंडवे येथील त्याच्यात घरात पकडले. त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर पिस्तूल व काडतुसे सापडली. त्याला घेऊन शनिवारी पहाटे पथक सांगलीत दाखल झाले.
पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे, हवालदार सुनील भिसे, श्रीपती देशपांडे, सागर लवटे, महेश आवळे, पप्पू सुर्वे, गुंड्या खराडे, शंकर पाटील, दिलीप हिंगाणे, नीलेश कोळेकर, सुप्रिया साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली. (प्रतिनिधी)
जयस्वालला कोठडी
अटकेत असलेल्या जयस्वालला शनिवारी दुपारी न्यायालयात उभे केले होते. न्यायालयाने त्यास तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. चोरगेला रविवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे. दोघांची कसून चौकशी सुरू आहे. चोरगेविरुद्ध मारामारीचे दोन गुन्हे सातारा पोलिसांत नोंद आहेत.

Web Title: Another pistol seized in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.