आणखी एक विक्रेता ताब्यात
By admin | Published: March 16, 2017 11:38 PM2017-03-16T23:38:38+5:302017-03-16T23:38:38+5:30
म्हैसाळ भ्रूण हत्याकांड : आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ
मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे यास गर्भपातासाठी औषध पुरवठा करणाऱ्या आणखी एका औषध वितरकास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. डॉ. खिद्रापुरे याचे साथीदार डॉ. श्रीहरी घोडके, डॉ. रमेश देवगीरीकर यांच्यासह सातजणांच्या पोलिस कोठडीत तीन दिवस वाढ करण्यात आली. पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने शुक्रवारी (दि. १७) डॉ. खिद्रापुरे यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
डॉ. खिद्रापुरे यास अवैध गर्भपातासाठी औषध पुरवठा करणाऱ्या सांगलीतील सुनील खेडेकर, भरत गटागट या औषध विक्रेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील एक औषध वितरक भरत गटागट याच्यामार्फत डॉ. खिद्रापुरे यास प्रतिबंधित औषधांचा पुरवठा करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने मुंबईतील संबंधित औषध वितरकास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
यापूर्वी अटक करण्यात आलेले डॉ. खिद्रापुरे याचे साथीदार डॉ. श्रीहरी घोडके, डॉ. रमेश देवगिरीकर, परिचारिका सौ. कांचन रोजे, उमेश साळुंखे, औषध विक्रेता सुनील खेडेकर, एजंट संदीप जाधव, वीरनगोंडा गुमटे यांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाचा तपास अपूर्ण असल्याने आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने सातही आरोपींच्या पोलिस कोठडीत दि. १९ पर्यंत वाढ केली.
गर्भलिंग निदान करणाऱ्या शिरोळ तालुक्यातील डॉक्टरची चौकशी सुरू असून, याप्रकरणी आणखी काहीजणांवर कारवाईची टांगती तलवार आहे. (वार्ताहर)