सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात आणखी एका वाघाची नोंद, ‘एसटीआर-टी २’ नामकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 07:14 PM2024-11-08T19:14:41+5:302024-11-08T19:22:24+5:30
विकास शहा शिराळा : सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात आणखी एका वाघाची नोंद झाली असून, येथील वाघांची संख्या दोन झाली ...
विकास शहा
शिराळा : सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात आणखी एका वाघाची नोंद झाली असून, येथील वाघांची संख्या दोन झाली आहे. सह्याद्री व्याघ्र राखीवचे क्षेत्रसंचालक रामानुजम, उपसंचालक स्नेहलता पाटील, उपसंचालक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या नवीन वाघाचे नामकरण ‘एसटीआर-टी २’ असे करण्यात आले आहे.
सह्याद्री व्याघ्र राखीव अंतर्गत चांदोली वन्यजीव विभागामध्ये २०१८ नंतर प्रथमच वाघाची नोंद झाली. क्षेत्रीय कर्मचारी वर्षभर या वाघाची दैनंदिन गस्ती, कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून नियमित देखरेख करत आहेत. विशेष म्हणजे सह्याद्रीतील मुसळधार पावसाळ्यातही वनअधिकारी व कर्मचाऱ्यांनी या पहिल्या वाघाच्या हालचालीवर यशस्वीरीत्या देखरेख ठेवली. हा वाघ गेले वर्षभर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पमध्येच वास्तव्य करून आहे. व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांसाठी अनुकूल अधिवास व प्राण्यांची संख्या पुरेशी उपलब्ध झाली आहे.
गेले वर्षभर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व भारतीय वन्यजीव संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री व्याघ्र प्रकल्पमध्ये व्याघ्र पुनर्स्थापनेसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. ताडोबा व्याघ्र राखीवमधून सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये वाघ पुनर्स्थापनेसाठी परवानगी प्राप्त झाली असून, लवरकरच याची कार्यवाही सुरू होणार आहे.
वाघांवर अभ्यास करणारे संशोधक गिरीश पंजाबी यांच्या निरीक्षणानुसार हा वाघ राधानगरी अभयारण्यामध्ये १३ एप्रिल, २०२४ रोजी नोंद झाला होता, राधानगरी अभयारण्यामधून उत्तरेस भ्रमण मार्गावाटे जवळपास १०० कि.मी चा प्रवास करून, या वाघाने आपला मुक्काम सह्याद्री व्याघ्र प्रकल्पमध्ये केला आहे.
गेल्या काही वर्षांत दक्षिणेस तिलारी ते राधानगरी या व्याघ्र भ्रमणमार्गामध्ये वाघांची संख्या वाढली आहे. एकूण १४ वाघांच्या नोंदी या भ्रमणमार्गामध्ये झाल्या आहेत. तिलारी ते सह्याद्री या व्याघ्र भ्रमणमार्गातून हे दोन्ही वाघ उत्तरेस सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये नैसर्गिकरीत्या आले आहेत. यावरून सह्याद्रीचा व्याघ्र भ्रमणमार्ग चांगल्या स्थितीत आहे व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा वाघांसाठी अधिक अनुकूल झाला आहे. त्यामुळे तिलारी ते राधानगरी व राधानगरी ते सह्याद्री या व्याघ्र भ्रमण मार्गातील अधिवासाच्या संवर्धनाचे महत्त्व अधिक वाढले आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये कायमस्वरूपी कॅमेरे ट्रॅप लावले आहेत. दि. २८ ऑक्टोबर, २०२४ रोजी चांदोली राष्ट्रीय उद्यानमध्ये अधिवास देखरेखीसाठी लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅप मध्ये रात्री ११ वाजून ४६ मिनिटांनी वाघाचे काही फोटो नोंद झाले. फोटोंचे विश्लेषण केल्यानंतर संशोधन टीमला हे फोटो पहिल्या वाघाचे नसून, एका वेगळ्याच वाघाचे असल्याचे समजले. - नंदकुमार नलवडे, वनक्षेत्रपाल, चांदोली.