स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: 'प्रतिसरकार' बनले होते स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणा स्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 03:47 PM2022-08-09T15:47:59+5:302022-08-09T15:49:29+5:30
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी १९४२ रोजी स्थापन केलेल्या प्रतिसरकारने ब्रिटिश सरकारला हादरे देत, त्यांची शासन व्यवस्था नाकारून लोकाभिमुख कारभार केला.
श्रीनिवास नागे
सांगली : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी १९४२ रोजी स्थापन केलेल्या प्रतिसरकारने ब्रिटिश सरकारला हादरे देत, त्यांची शासन व्यवस्था नाकारून लोकाभिमुख कारभार केला. जनतेत विश्वास निर्माण झाल्यामुळे प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले.
महाराष्ट्रातील साताऱ्यात झाली स्थापना
'चले जाव' चळवळीत बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया या जिल्ह्यांत प्रतिसरकार स्थापन झाली. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंहांनी ऑगस्ट १९४२ मध्ये प्रतिसरकार स्थापन केले. प्रशासनाचे कार्य भूमिगत क्रांतिकारकांनी हाती घेतले.
४ वर्षे चाललेले सरकार
महाराष्ट्रातील भूमिगतांनी सुनियोजित पद्धतीने चार वर्षे प्रतिसरकार चालवले, इंग्रजी सत्तेला शेवटपर्यंत दाद न देणारे हे एकमेव प्रतिसरकार होते. कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन-शिक्षा करणे यासारखी कामे प्रतिसरकारमार्फत केली जात असत.
लोकहितासाठी चौदा कलमी कार्यक्रम
प्रतिसरकारने औध संस्थानची पुरोगामी राज्यघटना थोड्याफार फरकाने स्वीकारून त्यानुसार कारभार चालवला. प्रत्येक गावात ग्रामसमिती स्थापन करण्यात आली. शिवाय सात ते तेरा गावांची गट समिती आणि त्यावर नियंत्रणासाठी मध्यवर्ती समिती होती. लोकहितासाठी चौदा कलमी कार्यक्रम जाहीर केला.
काय होता 'तो' कार्यक्रम
- दरोडेखोर, गावगुंडांच्या बंदोबस्तासह सावकारी नियंत्रण कायदा व जमिनीचे फेरवाटप केले. दारुबंदी करून हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. स्त्रियांना मानसन्मान देत विवाहितांचा छळ थांबवला. अंधश्रद्धा, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी पुढाकार घेतला.
- स्वतंत्र न्यायदान मंडळे स्थापन करून मोफत आणि त्वरित न्याय देण्याची व्यवस्था केली. चार वर्षांत प्रतिसरकारने ५० हजार खटल्यांचे निकाल देऊन ३४ कोटी रुपयांचा न्यायालयांचा खर्च वाचविला. अत्यंत कमी खर्चात लग्न करण्याची प्रथा सुरू केली. सार्वजनिक वाचनालये उघडली. साक्षरता वर्ग सुरु केले.
दीड हजार गावे आणि तुफान सेना
सुमारे दीड हजार गावांत प्रतिसरकारचा कारभार सुरू होता. न्यायदान, लोकांचे संरक्षण आणि ब्रिटिशांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी 'तुफान सेनेची स्थापना करण्यात आली. या दलात पाच हजार तरुण सहभागी झाले, त्यांना हत्यारे चालवण्याचेही प्रशिक्षण देण्यात आले.
प्रतिसरकार'चे झाले 'पत्री सरकार'
गुन्हेगारांवर, क्रांतिकारकांबद्दल चुगल्या करणाऱ्यांवर वचक बसावा म्हणून शिक्षा देण्यात येऊ लागली. त्याचे पाय बांधून तळपायावर काठ्यांनी बडवले जायचे, त्यालाच 'पत्री मारणे' म्हटले जायचे. त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन प्रतिसरकार'चे 'पत्री सरकार' झाले.