हिंदुत्ववाद्यांच्या धमक्यांना घाबरणार नाही अंनिस कार्यकर्त्यांचा निर्धार : सोशल मीडियावरून धमकीप्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:10 AM2018-08-23T00:10:36+5:302018-08-23T00:11:03+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राहुल थोरात यांना धमकी दिल्याप्रकरणी बुधवारी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दरम्यान, अशा धमक्यांना आम्ही घाबरणार नाही, असा
सांगली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राहुल थोरात यांना धमकी दिल्याप्रकरणी बुधवारी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दरम्यान, अशा धमक्यांना आम्ही घाबरणार नाही, असा निर्धार व्यक्त करीत, राज्य सरकारने हिंदुत्ववादी संघटना व त्यांच्या कार्यकर्त्यांबद्दलची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत केली.
अंनिसचे राहुल थोरात यांना मंगळवारी सोशल मीडियावरून जिवे मारण्याची धमकी आली आहे. त्याबाबत बुधवारी अंनिसचे राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, अॅड. के. डी. शिंदे, प्रदीप पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वंजाळे, ज्योती आदाटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर या पदाधिकाºयांनी पत्रकारांशी संवाद साधला.
बनसोडे म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडले जात आहेत. अशावेळी अंनिसच्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्यासाठी सोशल मीडियावरून काही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला जात आहे. कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. पण आम्ही डगमगणार नाही. विशाल गोराडे नावाच्या व्यक्तीने थोरात यांना कुटुंब संपविण्याची धमकी दिली. तो मराठा क्रांती मोर्चाचा कार्यकर्ता असल्याचे सांगतो. यातून मराठा क्रांती मोर्चा व पुरोमागी संघटनांत फूट पाडण्याचा प्रयत्न दिसतो. त्यातून मराठा क्रांती मोर्चाची, दाभोलकरांची बदनामी करण्याचा डाव आहे.
प्रदीप पाटील म्हणाले की, दाभोलकरांचे मारेकरी महाराष्ट्रात सापडले आहेत. आणखी ५०० मारेकरी तयार केल्याचे तपासात पुढे येत आहे. थोरात यांना धमकी देणारा भाजपच्या सोशल सेलचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्याच्यामागे राजकीय पाठबळ आहे का? याबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी.
सुधन्वा गोंधळेकर या शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याला अटक झाली आहे. त्यामुळे सनातनी व शिवप्रतिष्ठानच्या नेत्यांचीही चौकशी व्हावी. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या घरांची झडती घ्यावी. अशा संघटनांना दहशतवादी संघटना जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.
पोलिसांनी छडा लावावा
अॅड. के. डी. शिंदे म्हणाले की, हा सनातन्यांचा उन्माद आहे. अंनिस जवाब दो, असे आंदोलन करण्याचे धाडस या मंडळीत कोठून येते? आम्ही कायदेशीर मार्गाने हा प्रकार मोडून काढू. पोलिसांनी सखोल चौकशी करून या प्रकाराचा छडा लावावा.