नाट्यपंढरीतील स्पर्धेत रिकाम्या खुर्च्यांमुळे अस्वस्थता-रंगकर्मींमध्ये चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 11:41 PM2019-03-02T23:41:34+5:302019-03-02T23:48:46+5:30
रसिकांमधील उदासीनतेचे वारे सांगलीतील नाट्यपंढरीत भरलेल्या राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत वाहू लागले आहे. रिकाम्या खुर्च्यांपुढे कला सादर करताना भयाण अंध:कारातील प्रयोग रंगकर्मी अनुभवत
अविनाश कोळी ।
सांगली : रसिकांमधील उदासीनतेचे वारे सांगलीतील नाट्यपंढरीत भरलेल्या राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत वाहू लागले आहे. रिकाम्या खुर्च्यांपुढे कला सादर करताना भयाण अंध:कारातील प्रयोग रंगकर्मी अनुभवत असल्याचे चित्र याठिकाणी दिसत आहे. नाट्यप्रयोगाच्या वेळेपासून नियोजनातील चुकांपर्यंत अनेक कारणांनी नाट्यकलेतील एक महत्त्वाचा घटक दुरावताना दिसत आहे.
सांगलीच्या विष्णुदास भावे व मिरजेच्या बालगंधर्व नाट्यगृहात यंदाच्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा सोहळा सुरू आहे. रसिकांच्या दुष्काळाची चिंता या सोहळ््याला सतावत आहे. नाट्यपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीपासून राज्यातील बहुतांश शहरांमध्ये कमी-अधिक प्रमाणात हा दुष्काळ सतावत आहे. त्यामुळे स्पर्धांचे आर्थिक गणितही विस्कळीत झाले आहे. राज्याच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाला नाटकाचा लवाजमा घेऊन जाणे आणि प्रयोग सादर करणे हा मोठा आर्थिक कसरतीचा भाग बनला आहे. त्यातच प्रेक्षकांच्या घटत्या संख्येने कलाकारांच्या उत्साहावरही पाणी पडत आहे. स्पर्धेच्या नियोजनातील अनेकप्रकारच्या त्रुटींची वर्षानुवर्षे पुनरावृत्ती होत नव्या त्रुटींचा समावेशही त्यात होत आहे. त्यामुळे रसिक आणि नाटक यांच्यातील दरी वाढतच आहे. ही दरी कमी करण्यासाठी आजवर नियोजनात असणारी यंत्रणा काम करीत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे या स्पर्धांना एक औपचारिकता प्राप्त झाल्याचा सूरही तज्ज्ञांमधून उमटत आहे.
रसिकांना नाट्यगृहात खेचण्यासाठी आणि त्यांच्या रसिकतेला तृत्प करण्यासाठी कोणतेही नियोजन सध्या दिसत नाही. त्यातच अनेक बाह्य कारणांनीही प्रेक्षक नाट्यगृहापासून दुरावत आहे. कारणे कोणतीही असली तरी, त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अंतिम फेरीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातच रसिकांनी नाट्यस्पर्धेकडे पाठ फिरविल्याचा विषय उद्घाटक व अभिनेत्री सविता मालपेकर यांनी उपस्थित केला.
राज्यभरातील अनेक ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, स्थानिक कलाकार या सर्वांनाच प्रेक्षकांच्या कमी होत चाललेल्या संख्येची चिंता सतावत आहे. एकीकडे व्यावसायिक रंगभूमीवर अनेक नाटकांना हाऊसफुल्लचे फलक झळकत असताना हौशी रंगभूमीला रिकाम्या खुर्च्यांचा सामना करावा लागत आहे. हा विरोधाभास हौशी रंगभूमीसाठी धोक्याची घंटा वाजविणारा आहे.
आधुनिक साधनांचाही परिणाम
सध्या मनोरंजन हे घरबसल्या कोणत्याही क्षणी मिळणारी गोष्ट बनली आहे. आधुनिक साधनांचा हा परिणाम नाट्यगृहातील रसिकांवर परिणाम करणारा आहे. नाट्यगृहात सादर झालेली नाटके दुसºयादिवशी जर मोबाईलवर उपलब्ध होत असतील तर पे्रक्षक येणार तरी कसे, असा सवाल येथील रंगकर्मी मुकुंद पटवर्धन यांनी उपस्थित केला. याशिवाय स्पर्धेच्या नियोजनात असणाºया त्रुटी दरवर्षी दूर करायला हव्यात. त्यावर काम होत नसल्याने समस्या आणखी वाढत जात आहेत. स्पर्धेतील नाटकांचा दर्जा व्यावसायिक रंगभूमीच्या तोडीचा असावा, यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत, असे पटवर्धन म्हणाले.
रसिकांच्या घटत्या संख्येची कारणे...
राज्य नाट्य स्पर्धेच्या नियोजनातील त्रुटी -प्रयोगांच्या अडचणीच्या वेळा -सुमार दर्जाच्या नाटकांचे प्रयोग -परीक्षेच्या वेळेत आलेल्या स्पर्धा -रसिकांपर्यंत पोहोचण्याच्या यंत्रणेत कमतरता -नाट्यशास्त्र शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापकांची उदासीनता -नाटकांच्या दर्जात्मक पातळीवरील गैरनियोजन
राज्य नाट्य स्पर्धांचे संयोजन करताना रसिकांपर्यंत ते प्रभावीपणे पोहोचले पाहिजे. रसिकांना सोयीच्या ठरतील अशा प्रयोगांच्या वेळा हव्यात. याशिवाय दर्जात्मक पातळीवर या स्पर्धेमध्ये अधिक काम करता येऊ शकेल. ज्या माध्यमातून रसिकांना नाट्यगृहाशी जोडता येऊ शकते.
- श्रीनिवास जरंडीकर, सदस्य, मराठी नाट्य परिषद नियामक मंडळ
सांगलीतील भावे नाट्यगृहात गेल्या काही दिवसांपासून राज्य नाट्य स्पर्धेअंतर्गत अंतिम फेरीतील नाट्यप्रयोग सुरू आहेत. प्रेक्षकांच्या अल्प प्रतिसादामुळे नाट्यगृह ओस दिसत आहे.