APMC Election: बाजार समित्यांच्या निवडणुकीतील मविआचे यश म्हणजे...; जयंत पाटलांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 07:50 PM2023-04-29T19:50:26+5:302023-04-29T19:51:21+5:30
आज राज्यात बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल जयंत पाटील यांनी जनतेचे आभार मानले आहेत.
सांगली : बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेले घवघवीत यश महाराष्ट्रातील जनतेचा कल पुन्हा एकदा दाखवून देणारा आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे.
आज राज्यात बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल जयंत पाटील यांनी जनतेचे आभार मानले आहेत. गेल्या आठ - दहा महिन्यात शिंदे सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने १२०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शिवाय बाजार समितीच्या निवडणुका अधिक किचकट करण्याचा प्रयत्न देखील शिंदे सरकारने केला. त्यामुळे याविरोधात शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी जनमत किती मोठे आहे हे दाखवून दिले आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी सरकारला लगावला आहे.
१४८ बाजार समित्यांपैकी ७५ पेक्षा जास्त बाजार समित्या महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेने हे घवघवीत यश महाविकास आघाडीच्या मागे उभे केले आहे असा दावाही जयंत पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमूठीला भेगा पडल्या अशी टीका करण्यात आली परंतु ही वज्रमूठ अभेद्य आहे आणि फार मोठया क्षमतेची आहे हे आमच्या विरोधकांना कळले असावे असा उपरोधिक टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.
महाविकास आघाडीच्या बाजूने कल आहे हे शेतकऱ्यांनी, ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यानी दाखवून दिला आहे. कॅबिनेट मंत्र्यांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. पदवीधर मतदानात सुशिक्षित लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस शिवसेनेच्या महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आणि आज ग्रामीण भागातील बाजार समित्यांमध्ये कार्यरत असणारे सदस्य, सोसायटी सदस्य, व्यापारी या सर्वच घटकांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कल दिला आहे शिवाय राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना राष्ट्रवादीचे सर्व गड अभेद्य ठेवण्यात यश मिळाले असून राष्ट्रवादीच्या सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी यांचे जयंत पाटील यांनी आभार मानले आहेत.
सांगली जिल्ह्यातील बाजार समित्या जत, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील असून इथेही १८ जागा जिंकून आल्या आहेत. महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आणि सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडी किती भक्कमपणे व एकत्रित सक्षम राहिल्यावर काय करुन दाखवते हे आज स्पष्ट झाले असेही जयंत पाटील म्हणाले.