वनस्टॉप केंद्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:21 AM2021-06-04T04:21:22+5:302021-06-04T04:21:22+5:30
सांगली : केंद्र शासनाकडून जिल्ह्यात वन स्टॉप क्रायसेस केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात संकटग्रस्त महिलांना वैद्यकीय सुविधा, ...
सांगली : केंद्र शासनाकडून जिल्ह्यात वन स्टॉप क्रायसेस केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात संकटग्रस्त महिलांना वैद्यकीय सुविधा, पोलीस मदत, समुपदेशन व कायदेशीर मदत देण्यात येते. या केंद्राचे दैनंदिन कामासाठी पात्रताधारक एजन्सीची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
----
सारथीतर्फे तरुणांना नोकरीसाठी मार्गदर्शन
सांगली : एमपीएससी व स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध पदांच्या भरतीसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) तर्फे तरुणांना मार्गदर्शन करण्यात येते. संस्थेतर्फे तरुणांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून, पात्र तरुणांनी संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठा, कुणबी, मराठा-कुणबी समाजाच्या मदतीसाठी ही संस्था कार्यरत आहे.
----
शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या नकोत
सांगली : मान्सून लवकरच सक्रिय होणार असून, शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची तयारी केली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांनी किमान ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार चार जूनपर्यंत काहीठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी तुरळक सरी कोसळण्याची शक्यता आहे. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका या खरीप पीक पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी व वाखराच्या पाळ्या देऊन तयार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
----
सांगलीतून दुचाकी लंपास
सांगली : शहरातील शासकीय रुग्णालय परिसरात अज्ञाताने १५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी वाहिद महंमद जमादार (रा. खणभाग, सांगली) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. २८ मे रोजी शासकीय रुग्णालय परिसरातून दुचाकी चोरीची ही घटना घडली.