बियाणे, ट्रॅक्टर, ठिबकसाठी ९० हजार शेतकऱ्यांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:28 AM2021-05-27T04:28:07+5:302021-05-27T04:28:07+5:30

फोटो २६ संतोष ०४ खरिपाचा हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली आहे. छाया - सुरेंद्र दुपटे लोकमत ...

Applications of 90,000 farmers for seeds, tractors, drip irrigation | बियाणे, ट्रॅक्टर, ठिबकसाठी ९० हजार शेतकऱ्यांचे अर्ज

बियाणे, ट्रॅक्टर, ठिबकसाठी ९० हजार शेतकऱ्यांचे अर्ज

Next

फोटो २६ संतोष ०४

खरिपाचा हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली आहे.

छाया - सुरेंद्र दुपटे

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सन २०२१-२२ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिके, गळीत धान्य व व्यापारी पिकांसाठी अनुदान तत्त्वावर शासन बियाणे उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत.

येत्या खरीप हंगामात प्रमाणित बियाणे, पीक प्रात्यक्षिके व बियाणे मिनी किटसाठीही महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविले होते. नोंदणीसाठी गुरुवारपर्यंत (दि. २०) पर्यंत अंतिम मुदत होती. सांगलीसाठी कडधान्य, भरडधान्ये, तृणधान्याचे बियाणे पुरवले जाणार आहेत.

कडधान्य बियाणे ५० व २५ रुपये प्रती किलो, संकरीत मका व बाजरी १०० रुपये प्रती किलो, ज्वारी व बाजरी ३० व १५ रुपये प्रती किलो, सोयाबीन १२ रुपये किलो या दराने बियाणे मिळेल. एकूण किमतीच्या ५० टक्के अनुदान आहे. एका शेतकऱ्याला २ हेक्टरपर्यंत लाभ मिळेल.

पीक प्रात्यक्षिकासाठी एक एकरासाठी खतही मिळणार आहे. बियाणे, जैविक खते, सूक्ष्म मूलद्रव्ये, भू-सुधारके व पीक संरक्षण औषधे यासाठी प्रतिएकरी एका पिकासाठी २ ते ४ हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

बियाणे व पीक प्रात्यक्षिकांसाठी ४ हजार १२० अर्ज दाखल झाले असून, सर्वाधिक म्हणजे १,२६१ अर्ज जत तालुक्यातून आहेत. आटपाडी २२३, कडेगाव ३५३, कवठेमहांकाळ ६२९, खानापूर ८७, मिरज ४२६, पलूस १०९, शिराळा ५०, तासगाव ५८४ व वाळव्यातून ३९८ अर्ज आले आहेत.

चौकट

बियाण्यांसाठीही कमी अर्ज आले

बियाणे मिनी किट निवड झालेल्या शेतकऱ्यांना खरिपासाठी तूर, मूग आणि उडीद यांपैकी एका पिकाचे ४ किलोचे मिनी किट मिळेल. चार किलो तूर ४१२ रुपये, चार किलो मूग ४०७ रुपये व चार किलो उडीद ३४९ रुपये दराने मिळणार आहे. मिनीकिटची किंमत अनुदानापेक्षा जास्त असल्यास जास्तीची रक्कम शेतकऱ्याने भरायची आहे. या सर्वांसाठी शेतकऱ्यांची निवड ऑनलाइन लॉटरी पद्धतीने होणार आहे. जिल्ह्याचे उद्दिष्ट मोठे असताना अर्ज मात्र अपेक्षेपेक्षा कमी आले आहेत.

चौकट

निवड झाल्यावर येणार एसएमएस

विविध लाभ योजनांसाठी ऑनलाइन लॉटरी काढली जाणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्याला नोंदणीकृत मोबाइलवर तसा एसएमएस मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी निवडीच्या चौकशीसाठी कृषी कार्यालयात हेलपाटे मारण्याची आवश्यकता राहणार नाही. संकेतस्थळावरही शोधाशोध करावी लागणार नाही.

चौकट

बियाण्यांचे टार्गेट मोठे; अर्ज मात्र कमी

१. मिनी किटची किंमत अनुदानापेक्षा जास्त असल्यास जास्तीची रक्कम शेतकऱ्याने भरायची आहे.

२. या सर्व अनुदान तथा लाभांसाठी शेतकऱ्यांची निवड ऑनलाइन लॉटरी पद्धतीने होणार आहे.

३. जिल्ह्यात बियाण्याचे टार्गेट भरपूर असताना लाभार्थी शेतकऱ्यांचे अर्ज मात्र कमी आले आहेत.

चौकट

जिल्हाभरातून ९० हजार अर्ज

- यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर्स यांसह विविध यंत्रांसाठी ४३ हजार ६८३ अर्ज आले आहेत. पैकी ट्रॅक्टरसाठी १५ हजार ८५९ अर्ज आहेत.

- सिंचन योजनेंतर्गत ठिबक सिंचनासाठी १५ हजार ७०८ अर्ज आहेत. शेततळे, पाइप, शेततळ्याचा कागद, वीज पंप, स्प्रिंकलर असे एकूण ३२ हजार १८८ अर्ज आले आहेत.

- हरितगृह, कांदा चाळ, शेडनेट गृह, गांडूळ खत प्रकल्प, प्रक्रिया प्रकल्प आदींसाठीही ९ हजार ९१९ अर्ज दाखल झाले आहेत.

कोणत्या योजनेसाठी किती अर्ज?

बियाणे - २३७५

ट्रॅक्टर - १५,८५९

हरितगृह - २२८

कांदा चाळ - ८७७

शेडनेट गृह - ३७७

कोट - लॉकडाऊनमुळे सेतू बंद, इंटरनेटच्याही समस्या

बियाणे आणि यांत्रिकीकरणासाठी ऑनलाइन अर्ज दाखल केला आहे. माहिती उशिरा मिळाल्याने ऐनवेळेस प्रस्ताव दाखल केला. गावाकडे इंटरनेटची समस्या असल्याने पोर्टलवर अर्ज दाखल करण्यात अडचणी आल्या. कृषी सहायकाने मार्गदर्शन केल्याने अर्ज करणे सोपे गेले. आता निवड होण्याची प्रतीक्षा आहे. अनुदानावर सिंचनाचे साहित्य मिळाल्यास फायदा होईल. खरिपाचा हंगाम तोंडावर आला आहे, त्यामुळे बी-बियाणे, खतेदेखील वेळेत मिळायला हवीत. यापूर्वीही एकदा अर्ज केला होता; पण निवड झाली नव्हती.

- राजाराम माळी, शेतकरी, जत

बियाण्यांचे जिल्ह्याचे उद्दिष्ट मोठे आहे; पण तुलनेने अर्ज कमी आले आहेत. त्यामुळे अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवारपर्यंत (दि.२४) वाढवावी लागली. सध्या लॉकडाऊनमुळे गावोगावची सेतू केंद्रे बंद आहेत, त्यामुळेही शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने अर्ज दाखल करता आले नाहीत. मोबाइलवरून दाखल करण्यात मर्यादा होत्या. मुदतीच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी उशिरापर्यंत प्रयत्न करून अर्ज भरले. बी-बियाणे, सिंचन व्यवस्था, यांत्रिकीकरण यांना मोठा प्रतिसाद आहे.

- बसवराज मास्तोळी, जिल्हा कृषी अधीक्षक.

Web Title: Applications of 90,000 farmers for seeds, tractors, drip irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.