गणेशोत्सवाचा ‘तासगाव पॅटर्न’ राबवू

By admin | Published: August 26, 2016 10:13 PM2016-08-26T22:13:55+5:302016-08-26T23:13:10+5:30

कृष्णात पिंगळे : तासगाव पोलिस ठाण्यात गणेशोत्सव मंडळांची बैठक

Apply Ganesh Festival's 'Hourgaan Pattern' | गणेशोत्सवाचा ‘तासगाव पॅटर्न’ राबवू

गणेशोत्सवाचा ‘तासगाव पॅटर्न’ राबवू

Next

तासगाव : तासगाव शहरात मागील वर्षी डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यावर्षीही सर्वच मंडळांकडून डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा होईल, याची खात्री आहे. यावेळी सर्वच मंडळांनी विधायक उपक्रम राबवून गणेशोत्सवाचा तासगाव पॅटर्न निर्माण करावा, असे आवाहन तासगावचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी केले.
तासगाव पोलिस ठाण्यात तालुक्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांची बैठक झाली. यावेळी तहसीलदार सुधाकर भोसले, नगराध्यक्ष अविनाश पाटील, पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक धनाजी पिसाळ, डॉ. संतोष पाटील यांच्यासह शहर आणि तालुक्यातील पोलिस पाटील उपस्थित होते.
यावेळी पिंंगळे म्हणाले, गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकीतून डॉल्बी वाजविल्यामुळे अनेकांना शारीरिक व्याधींचा सामना करावा लागत आहे. किंबहुना काही मिरवणुकीत डॉल्बीच्या तालावर अनेक तरुण सैराट झाल्याचे पाहायला मिळतात. त्यामुळे डॉल्बीला फाटा देत, यावेळी नाचून सैराट होण्याऐवजी ध्येयासाठी सैराट व्हा. नियमांचे उल्लंघन केल्यास कोणाचीही गय करण्यात येणार नाही.
नियम डावलून डॉल्बी वाजविल्याचे आढळल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. मंडळांनी यावेळी गणेशोत्सवाला विधायक स्वरुप द्यायला हवे. रक्तदान शिबिर, वृक्षारोपण यासह सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सवाचा तासगाव पॅटर्न निर्माण करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तहसीलदार सुधाकर भोसले म्हणाले, विधायक उपक्रमांचा चांगला पायंडा गेल्यावर्षी सुरु झाला आहे. यावर्षीही सर्व मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवून उत्सव साजरा करायला हवा. समाजाचे प्रबोधन होईल, असा उत्सव साजरा करुयात.
नगराध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले, पारंपरिक सणांचे महत्त्व जपण्याचे ठरवले, तर प्रशासनाला कारवाई करावीच लागणार नाही. येणाऱ्या पिढीचे प्रबोधन करण्यासाठी मंडळांनी पुढाकार घ्यायला हवा.
बैठकीस तासगाव शहर तसेच तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)


जलयुक्त शिवार : पुढाकारासाठी आवाहन
दुष्काळमुक्तीसाठी राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार अभियानासारखी महत्त्वांकाक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला गणेशोत्सव मंडळांनी हातभार लावण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंंदे यांनी केले आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त मंडळांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंंगळे यांनी यावेळी केले. त्यांच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत, तीन मंडळांनी प्रत्येकी पाच हजार रुपये देणार असल्याचे यावेळी जाहीर केले.

गणेशोत्सवाला विधायक स्वरूप द्या
गेल्या काही वर्षात गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत आहे. तासगावमधील मंडळांनी यासाठी पुढाकार घेऊन गणेशोत्सवाचे विधायक स्वरूप परत मिळवून द्यावे, असे आवाहन यावेळी पिंगळे यांनी केले.

Web Title: Apply Ganesh Festival's 'Hourgaan Pattern'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.