खानापूरजवळ टेंभूचे पाणी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:48 PM2019-04-23T23:48:06+5:302019-04-23T23:48:11+5:30

पांडुरंग डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क खानापूर : तब्बल वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘कृष्णामाई’ खानापूर घाटमाथ्यावर अवतरली आणि संपूर्ण घाटमाथ्यावर ...

Applying water to the Tembau near Khanapur | खानापूरजवळ टेंभूचे पाणी दाखल

खानापूरजवळ टेंभूचे पाणी दाखल

googlenewsNext

पांडुरंग डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खानापूर : तब्बल वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘कृष्णामाई’ खानापूर घाटमाथ्यावर अवतरली आणि संपूर्ण घाटमाथ्यावर उत्साही व आनंदी वातावरण पसरले. गेल्या पाच वर्षांपासून घाटमाथ्यावरील सर्वच गावांत भीषण पाणीटंचाई जाणवत असताना ‘कृष्णामाई’चे झालेले आगमन घाटमाथ्यावरील ‘दुष्काळ’ कायमचा संपविणार असल्याची भावना लोकांमधून व्यक्त होत आहे.
खानापूर घाटमाथ्यावर टेंभू योजनेच्या भूड येथील पाचवा टप्पा पूर्ण झाल्यानंतर कृष्णेचे पाणी येणार होते. त्यामुळे पाचव्या टप्प्याकडे संपूर्ण खानापूर पूर्व भागाचे लक्ष लागून राहिले होते. १९९७ मध्ये स्थापन झालेल्या टेंभू योजनेच्या भूड येथील पाचव्या टप्प्याचे काम पूर्ण होण्यास २०१९ उजाडले. पाचव्या टप्प्याचे काम पूर्ण होणार का? घाटमाथ्यावर पाणी येणार का? अशी साशंकता व्यक्त होत होती. मात्र पाचव्या टप्प्याच्या कामास गेल्या सात-आठ महिन्यांपासून गती आली आणि प्रत्यक्ष पाचव्या टप्प्यावर कार्यरत यंत्रणेच्या अथक् प्रयत्नाने पाचवा टप्पा पूर्ण होऊन यशस्वी झाला.
गेली पाच वर्षे खानापूर घाटमाथा भीषण दुष्काळास तोंड देत आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने शेती व्यवसाय उद्ध्वस्त झाला आहे, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सर्व स्रोत आटल्याने अत्यंत गंभीर बनला आहे. तलाव, विहिरींबरोबर कूपनलिकांचे पाणी संपल्याने सर्व गावांना टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टॅँकर भरण्यासाठी जवळपास पाणी नाही. यामुळे खानापूर घाटमाथा टेंभूच्या पाण्याकडे डोळे लावून बसला होता. पाचवा टप्पा जिव्हाळ्याचा व जीवन-मरणाचा प्रश्न बनला होता.
गेल्या आठवड्यापासून पाचवा टप्पा आज सुरू होणार, उद्या सुरू होणार, अशा बातम्यांमुळे लोकांत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. मागील दोन दिवसांत दोनवेळा पाचवा टप्पा सुरू करण्याचा प्रयत्न झाला. परंतु काही अडचणींमुळे यशस्वी झाला नाही. अखेर रविवारी सकाळी भूडच्या पाचव्या टप्प्याची एक मोटर सुरू झाली.
बलवडी (खा.) च्या मुख्य टाकीत पाणी आले, अशी बातमी घाटमाथ्यावर पसरली आणि लोकांनी बलवडी (खा.)कडे धाव घेतली. वाहते पाणी पाहून लोकांनी जल्लोष करून आनंद व्यक्त केला.

Web Title: Applying water to the Tembau near Khanapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.