सांगली महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती; सुनील पवार यांच्याकडे कार्यभार, नगरविकासाचे आदेश
By शीतल पाटील | Published: August 24, 2023 05:59 PM2023-08-24T17:59:04+5:302023-08-24T17:59:13+5:30
सांगली महापालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ १९ ऑगस्ट रोजी संपल्यामुळे लोकप्रतिनिधींची समिती बरखास्त झाली आहे.
सांगली : सांगली महापालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ १९ ऑगस्ट रोजी संपल्यामुळे लोकप्रतिनिधींची समिती बरखास्त झाली आहे. नगरविकास विभागाने महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीचे सर्वाधिकार प्रशासक म्हणून पवार यांच्याकडे आले आहेत. महापालिकेची निवडणुक ऑगस्ट २०१८ मध्ये झाली होती. नवनिर्वाचित नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १९ ऑगस्टला संपला आहे. आता महापालिकेवर प्रशासकांची राजवट आली आहे. नगरसेवकांची मुदत संपण्यापूर्वीच नगरसचिव कार्यालयाने प्रशासक नियुक्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी यांनी प्रशासक नियुक्तीचे आदेश जारी केले.
यात राज्य निवडणुक आयोगाने विहित मुदतीत निवडणुका घेणे शक्य नसल्याने प्रशासक नियुक्तीची शिफारस केली आहे. महापालिका अधिनियमानुसार पालिकेची मुदत ही पहिल्या बैठकीपासून जास्तीत जास्त पाच वर्षाची असल्यामुळे नगरसेवकांची मुदत पुढे सुरू ठेवता येणार नाही. त्यामुळे महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त सुनील पवार यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत विकास कामे प्रशासकांच्या माध्यमातून चालणार आहेत. त्यामुळे प्रशासक म्हणून काम करण्यास सुनील पवार यांना अधिक वाव मिळणार आहे. पाच ते २५ लाखांपर्यंतचे आणि त्यापेक्षा अधिक रक्कम असणाऱ्या प्रस्तावांना प्रशासक मंजुरी देऊ शकतात. प्रशासकाच्या राजवटीमुळे महापालिकेतील लोकप्रतिनिधींचे अधिकार संपले आहेत. प्रशासनातर्फे पदाधिकाऱ्यांना दिलेली वाहने परत घेतली आहेत. कार्यालयेही सील केली आहेत. तसेच यापुढे लोकप्रतिनिधींना त्यांच्या लेटरहेडवर माजी नगरसेवक या नावाने पत्रव्यवहार करावा लागणार आहे.