पूरबाधित गावात स्वच्छता करण्यासाठी पथकांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 05:30 PM2019-08-13T17:30:18+5:302019-08-13T17:34:11+5:30
सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बाधित झालेल्या गावांतील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी स्वच्छता व आरोग्य विषयक समुचित उपाययोजना तातडीने करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद अधिनस्त विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असलेली पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
सांगली: सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बाधित झालेल्या गावांतील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी स्वच्छता व आरोग्य विषयक समुचित उपाययोजना तातडीने करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद अधिनस्त विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असलेली पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
या पथकांनी त्यांना सोपविलेल्या गावांमध्ये हजर होवून तेथे स्वच्छता व आरोग्य विषयक उपाययोजना कराव्यात. या कामकाजामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय अथवा टाळाटाळ होणार नाही याची सर्व संबंधितानी दक्षता घ्यावी. अन्यथा संबंधिताविरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील नियम 56 नुसार कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत म्हणाले, पूरपरिस्थिती पश्चात करावयाच्या उपाययोजनांमध्ये पूर्वतयारी व नियोजनामध्ये गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामपंचायतस्तरीय विविध संस्थांचे विविध पदाधिकारी यांच्याशी संपर्क करून गावांमध्ये करावयाच्या स्वच्छता व आरोग्य विषयक उपाययोजनांचे प्राथमिक नियोजन करण्यात येत आहे.
यासाठी गावातील ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, शिक्षक, युवा मंडळे, महिला बचत गट, अन्य स्वयंसेवक यांचे पथक तयार करून बाहेरून आलेल्या स्वयंसेवकांसोबत समन्वय साधण्यात येत आहे.
गावफेरी व स्थळ पाहणी करून करावयाच्या कामांचा अंदाज बांधून त्यासाठी आवश्यक साहित्य, यंत्र सामग्री, मनुष्यबळ इत्यादींचा अंदाज बांधणे, त्याचप्रमाणे कचरा, मृत जनावरे यांची विल्हेवाट लावण्यासाठी गावाबाहेर सर्व संमतीने सुयोग्य जागा निवडणे. ही जागा पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून दूर असावी. जे. सी. बी., ट्रॅक्टर, घंटागाडी, फावडे, पाट्या, झाडू, दोर, हूक तसेच मीठ, चुना, टी. सी. एल., मेडीक्लोअर, फॉगिंग मशिन, हॅण्ड ग्लोव्हज, गम बूट, मास्क व अन्य आवश्यक सामग्री उपलब्ध करून घेण्यात येत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत म्हणाले, गावांची स्वच्छता करण्यासाठी तुंबलेल्या गटारी वाहत्या कराव्यात, साचलेल्या पाण्याचा निचरा करावा, जे. सी. बी., ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमा झालेला कचरा गावांबाहेर सुयोग्य ठिकाणी जमा करून योग्यरीतीने (मातीआड करून/पुरून) त्याची विल्हेवाट लावावी. डस्टींग पावडर फवारणी तसेच फॉगिंग करावे. यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा. पाणी शुध्दीकरणासाठी टी. सी. एल. पावडरचा योग्य वापर करावा. ओ. टी. घेवून पाणी नमुने तपासणी करावी, मेडीक्लोअरचे वाटप करावे, डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी (जळके) ऑईल डबक्यामध्ये टाकावे, गावांतील सर्व नागरिकांची वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणी करून घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, आजारी जनावरांचे औषधोपचार करून घ्यावेत, पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने मृत जनावरांची सुयोग्य ठिकाणी शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावावी. स्थानिक परिस्थितीनुसार चारा / पशुखाद्य उपलब्ध होण्याबाबत समन्वय साधावा, असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत म्हणाले, घरांमध्ये जावून स्वच्छता, आरोग्य याबाबत प्रबोधन करावे, घर व परिसराची स्वच्छता करावी, पाणी उकळून प्यावे, आरोग्य विषयक प्रतिबंधात्मक उपायोजना याबाबत माहिती द्यावी. सार्वजनिक व खाजगी इमारतींची, घरांची पाहणी करून त्या धोकादायक नसल्याची खात्री करावी व त्याबाबत यथास्थिती अहवाल सादर करावा. जोखीमग्रस्त, धोकादायक इमारती, घरांबाबत गावातील नागरिकांना अवगत करावे. सार्वजनिक व खाजगी इमारतींच्या, घरांच्या पडझडीबाबत व नुकसानीबाबत पाहणी करून त्याबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा. प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजना यांचे अंतर्गत घरकुलांच्या पूरपश्चात सद्यस्थितीबद्दल विहीत प्रपत्रांमध्ये माहिती घ्यावी. गावांमध्ये अन्य स्वयंसेवी संस्थांकडून, व्यक्तिंकडून करण्यात येत असलेल्या स्वच्छता व आरोग्य विषयक कामकाजाच्या अनुषंगाने त्यांच्याशी समन्वय ठेवावा, स्वच्छता व आरोग्य विषयक कामाच्या प्रगतीबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या.