कुपवाडमधील गॅस शवदाहिनीसाठी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:27 AM2021-04-21T04:27:22+5:302021-04-21T04:27:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुपवाड : शहरातील जुना बुधगाव रस्त्यालगत असलेल्या गॅस शवदाहिनीमध्ये कुशल कर्मचारी नसल्याने गेल्या काही दिवसांपासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : शहरातील जुना बुधगाव रस्त्यालगत असलेल्या गॅस शवदाहिनीमध्ये कुशल कर्मचारी नसल्याने गेल्या काही दिवसांपासून शवदाहिनी बंद होती. मात्र, महापालिका प्रशासनाने दोन प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून गॅस शवदाहिनी सुरू केली आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.
शहरासह विस्तारित परिसरातील निधन झालेल्या व्यक्तीचे कुपवाडमधील मुख्य स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात यावेत यासाठी महापालिका प्रशासनाने ५७ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या नवीन गॅस शवदाहिनीसाठी गुजरातमधील एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. मात्र सदरचा कर्मचारी गेल्या काही महिन्यांपासून गैरहजर राहिल्याने गॅस शवदाहिनी बंद होती. सदरची गॅस शवदाहिनी सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिकेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार महापालिका प्रशासनाने दोन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. स्वछता निरीक्षक सिद्धांत ठोकळे यांच्या नियंत्रणाखाली ऋषिकेश बनसोडे व गणेश भोसले हे कर्मचारी काम पाहणार आहेत. शहरातील ज्या नागरिकांचे निधन झाले आहे, त्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार गॅस शवदाहिनीमध्ये करायचे आहे, अशा नातेवाइकांनी महापालिका आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त गायकवाड यांनी केले आहे.
यावेळी वरिष्ठ स्वछता निरीक्षक अनिल पाटील, अतुल आठवले, प्रज्ञावंत कांबळे, मुकादम अनिल पवार, संजय सरोदे उपस्थित होते.