इस्लामपूरच्या नेर्लेकर मूकबधिर विद्यालयावर जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकाऱ्यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:27 AM2019-06-06T00:27:52+5:302019-06-06T00:31:20+5:30
इस्लामपूर (ता. वाळवा) येथील डॉ. व्ही. एस. नेर्लेकर मूकबधिर शाळेच्या चौकशीमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे कारवाई करण्याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अपंग कल्याण आयुक्तांकडे पाठविला होता. त्याआधारे नेर्लेकर मूकबधिर विद्यालयावर
सांगली : इस्लामपूर (ता. वाळवा) येथील डॉ. व्ही. एस. नेर्लेकर मूकबधिर शाळेच्या चौकशीमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे कारवाई करण्याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अपंग कल्याण आयुक्तांकडे पाठविला होता. त्याआधारे नेर्लेकर मूकबधिर विद्यालयावर अपंग कल्याण आयुक्तांनी समाजकल्याण अधिकाºयांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. तसा अहवाल आयुक्तांनी राज्य शासनाकडे पाठविला आहे.
नेर्लेकर मूकबधिर विद्यालयाच्या गैरकारभाराबाबत संस्थेतील कर्मचारी जयवंत शामराव जाधव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. याची दखल घेऊन सीईओ राऊत यांनी नेर्लेकर विद्यालयाच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. या समितीने दिलेल्या अहवालामध्ये म्हटले की, नेर्लेकर विद्यालयाचे विशेष शिक्षक अभिमन्यू रानमाळे यांनी विद्यार्थिनींची छेडछाड केली आहे. ते संस्थेच्या वसतिगृहामध्ये बेकायदेशीर निवासासाठी होते. वसतिगृहात राहत असूनही त्यांना घरभाडे भत्ता व वाहन भत्ता दिला जात आहे.
विद्यार्थ्यांकडून घरकाम करून घेतले जात आहे. वर्गामध्ये शैक्षणिक काम व्यवस्थित केले जात नाही, तरीही संस्थेकडून त्यांना पाठीशी घातले जात आहे. कार्यालयीन कामकाज, रोखेवही लिहिणे, पत्रव्यवहार आदी कामे वर्ग चारचे कर्मचारी दाडमोडे यांच्याकडून करून घेतली जात आहेत. शाळेच्या आर्थिक व्यवहाराबाबत ठेवण्यात येणारी रोखेवही दि. २९ सप्टेंबर २०१८ पासून भरलेली नाही. रोखेवही मुख्याध्यापक प्रमाणित करीत नाहीत आणि प्रतीस्वाक्षरीही करीत नाहीत. या गंभीर त्रुटी चौकशीमध्ये आढळून आल्या आहेत.
या सर्व प्रकरणाची सुनावणी अपंग कल्याण आयुक्त कार्यालयात झाली आहे. या त्रुटीनुसारच नेर्लेकर विद्यालयाचा कारभार प्रशासकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. प्रशासक म्हणून जि. प. समाजकल्याण अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.
विद्यालयातील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यात वाद चालू आहेत. संस्थापकांचे नियंत्रण राहिले नसल्याने प्रशासक नियुक्त केला आहे. त्यानंतर संस्थेच्या सर्वच कारभाराची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची शिफारसही अपंग कल्याण आयुक्तांनी केली आहे.
लैंगिक अत्याचाराच्या चौकशीसाठी समिती
संस्थेतील विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार व इतर मुद्द्यांच्या अनुषंगाने विशेष समिती गठित करून सखोल चौकशी करण्याची सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना केली आहे. या चौकशीमध्ये जे दोषी आढळतील, त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशा सूचनाही अपंग कल्याण आयुक्त नितीन ढगे यांनी दिल्या आहेत.
चौकशी समितीने उपस्थित केलेले मुद्दे
रोखेवहीमध्ये मासिक घोषवारा काढल्याची नोंद नाही
आर्थिक व्यवहार रोखीने केले जातात
शाळेच्या साहित्य खरेदीकरिता दरपत्रक न मागविता खरेदी
खरेदी केलेल्या साहित्याची जडवस्तू संग्रह नोंदवही नसल्याने शाळेने खरेदी केलेल्या वस्तूंच्या कुठे नोंदीच नाहीत
विद्यार्थ्यांना नियमानुसार पोषण आहार दिला जात नाही
विद्यार्थ्यांना पुरेसा व सकस आहार दिला जात नाही
विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती नाही
शाळेतील पदे संस्थेने बिंदुनामावलीनुसार भरलेली नाहीत
विद्यार्थ्यांच्या निवासाच्या ठिकाणी पुरेशा खिडक्या, पंखे व प्रकाशाची व्यवस्था नाही
सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत