जिल्ह्यात १०१८ खण उत्खननास मंजुरी
By admin | Published: October 7, 2014 10:59 PM2014-10-07T22:59:07+5:302014-10-08T00:19:31+5:30
जिल्हा प्रशासन : वाळूची लिलाव प्रक्रिया पुढील महिन्यात
सांगली : जिल्ह्यातील १ हजार १८ खणींच्या उत्खननास जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. यामध्ये दगड, माती व मुरुमाचा समावेश आहे. दरम्यान, वाळू ठेक्याची लिलाव प्रक्रिया पुढील महिन्यापासून सुरु होण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या अध्यक्षतेखाली खणी प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली असून, भूजल अधिकारी व प्रदूषण अधिकारी व जिल्हा खणीकर्म अधिकारी याचे सदस्य आहेत. या समितीकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांमधील १ हजार १८ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये १३७ दगड खणी असून, मुरुमाच्या ४६१, तर मातीच्या ४२० खणी आहेत. या सर्व खणी खासगी जागेतील आहेत. समितीने ठरवून दिलेल्या कालावधितच या खणींतून उपसा करण्याची सक्ती आहे. सरकारी जागेतील खणींमधून उपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
जिल्ह्यातील वाळू ठेक्यांची लिलाव प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यापासून सुरु करण्यात येणार आहे. गतवर्षी वितरित करण्यात आलेल्या ठेक्यांची मुदत ३० सप्टेंबररोजी संपलेली आहे. आता या वर्षासाठी नव्याने लिलाव प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. वाळू ठेक्यांची लिलाव प्रक्रिया पूर्ण करीत असतानाच या ठेक्यांच्या मंजुरीसाठीचा प्रस्ताव राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडे पाठविण्यात येणार आहे.
पर्यावरण समितीची मंजुरी मिळाल्यानंतरच संबंधित प्लॉटमधील वाळू उपशाला परवानगी देण्यात येणार आहे. अन्यथा हा ठेका रद्द करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातून ९९ वाळू प्लॉटचे प्रस्ताव पाठविणार
राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडे जिल्ह्यातील ९९ वाळू प्लॉटचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. यासाठी ग्रामसभेची मंजुरी घेण्यात येत आहे. त्यानंतर विभागीय आयुक्तांकडून या प्लॉटची मूळ किंमत ठरवून घेण्यात येणार आहे.