अर्ध्या मिनिटात ३९ विषयांना मंजुरी

By admin | Published: April 25, 2017 11:26 PM2017-04-25T23:26:38+5:302017-04-25T23:26:38+5:30

तासगाव पालिकेत सभा गुंडाळण्याचे रेकॉर्ड : राष्ट्रवादीचा विरोध ‘नॉट नोटिसेबल’

Approval of 39 subjects in half minute | अर्ध्या मिनिटात ३९ विषयांना मंजुरी

अर्ध्या मिनिटात ३९ विषयांना मंजुरी

Next



तासगाव : तासगाव नगरपालिकेची मंगळवारी झालेली सर्वसाधारण सभा अवघ्या अर्ध्या मिनिटातच गुंडाळण्यात आली. विषयपत्रिकेवरील सर्व ३९ विषयांना बहुमताने मंजुरी देऊन अर्ध्या मिनिटातच सभा संपवण्याचे नवे रेकॉर्ड पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केले. तर सभा गुंडाळण्याला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनादेखील सत्ताधाऱ्यांनी नॉट नोटिसेबल ठरवले.
नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेची सभा झाली. यावेळी मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला अहवाल वाचन करण्यापूर्वीच नगरसेवक जाफर मुजावर यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्याची मागणी केली. त्याला सत्ताधारी नगरसेवकांनी तात्काळ पाठिंबा दिला. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोध करण्यापूर्वीच नगराध्यक्षांसह भाजपचे सर्व नगरसेवक अर्ध्या मिनिटात सभा गुंडाळून सभागृहाबाहेर पडले, तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा विरोध नोंदवून बहुमताने सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
राष्ट्रवादीचे नगरसेवक चुकीच्या कामांना विरोध करतात. म्हणूनच सभा गुंडाळून तासगावच्या जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप यावेळी नगरसेवक अभिजित माळी यांनी केला. चर्चाच करायची नसेल तर सभा घेताच कशाला? असा सवाल नगरसेविका निर्मला पाटील यांनी उपस्थित केला.
विषय पत्रिकेवरील ३९ विषय बहुमताने मंजूर झाले. त्यामध्ये स्ट्रीट लाईट दुरुस्ती, कचरा निर्मूलनासाठी आवश्यक रकमेची तरतूद, वॉटर मीटर रिडिंग घेणे, वसुली करणे, बिले देणे याकामासाठी ठेका देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत विविध विकासकामांसाठी निधी खर्च करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
सिध्देश्वर कॉलनीत रस्ता करण्याच्या कामासाठी प्राप्त निविदांपैकी महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन्सच्या अंदाजपत्रकीय दराच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. सिध्देश्वर कॉलनीतील अंतर्गत गटरकामासाठी दाखल पाच निविदांपैकी सर्वात कमी अंदाजपत्रकीय दराने दाखल झालेल्या तुषार कदम यांची निविदा मंजूर करण्यात आली.
सांगली नाका ते स्मशानभूमीकडे जाणाऱ्या कॉजवेच्या कामामधील संरक्षण भिंत बांधण्याच्या कामासाठीची अर्धा टक्के कमी दराची तुषार कदम यांची निविदा मंजूर करण्यात आली, तर प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी दाखल तीन निविदांपैकी सर्वात कमी रकमेची ७.७७ टक्के इतक्या जादा दराची डेक्कन इन्फ्रा, सांगली यांची निविदा मंजूर करण्यात आली, तर दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत कांबळेवाडीजवळील रिंगरोडवरील नवीन पुलापासून ते साठेनगर स्मशानभूमीपर्यंत एलईडी लॅम्प बसविण्यासाठी दाखल तीन निविदांपैकी पमा इंजिनिअर्स अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल्सची सर्वात कमी अर्धा टक्के कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली. (वार्ताहर)ं ‘लोकमत’चा अचूक अंदाज

‘लोकमत’मधून मंगळवारी होणारी पालिकेची सभा कोणत्याही चर्चेशिवाय गुंडाळण्यात येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी झालेली पालिकेची सभा कोणत्याही चर्चेशिवाय अवघ्या काही सेकंदात गुंडाळून सभा गुंडाळण्याचे नवे रेकॉर्ड केले. सभा गुंडाळण्याचा ‘लोकमत’चा अंदाज अचूक ठरला.

Web Title: Approval of 39 subjects in half minute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.