सांगली महापालिकेचा गतिमान कारभार, एका सेकंदात वीस विषयांना मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 05:21 PM2023-04-21T17:21:22+5:302023-04-21T17:21:38+5:30
दुप्पट पाणीपट्टी आकारण्याचा निर्णय प्रलंबित
सांगली : गतिमान कारभाराचा दाखला देत महापालिकेच्या महासभेने गुरुवारी एका सेकंदात २० विषयांना मंजुरी दिली. महत्त्वाच्या अनेक विषयांवर चर्चाही न करता केवळ इशाऱ्यावर अख्खे विषयपत्र मंजूर झाले.
सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची महासभा गुरुवारी पार पडली. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सदस्यांच्या प्रत्येक विषयावर चर्चा होईल, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे विषयपत्रिकेच्या वाचनापूर्वीच तीन तास पाणीपुरवठ्यावर चर्चा झाली. यातून काहीही निर्णय झाला नाही. सकाळी साडेअकराला सभा सुरू झाली होती. मात्र, विषयपत्रिकेवरील विषय वाचनास अडीच वाजता सुरुवात झाली. दुखवट्याचे व अभिनंदनाचे ठराव वाचन झाल्यानंतर विषयपत्रिकेवरील मुख्य विषय चर्चेत येणार होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी सभा तहकूब करून सोमवारी पुन्हा घेण्याची मागणी केली.
काही सदस्यांनी तहकूब करण्यापेक्षा विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्याचे सुचविले. भाजपच्या काही नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याचा एक विषय प्रलंबित ठेवून अन्य विषयांच्या मंजुरीस नाहरकत दिली. त्यामुळे केवळ एका सेकंदात सर्व विषयांना मंजुरी देऊन सभा संपविण्यात आली. मिरजेतील ३०३.९० चौरस मीटरच्या भूखंडाची अदलाबदल करण्यासही मंजुरी देण्यात आली.
या विषयांना मिळाली मंजुरी
- सांगलीतील सर्किट हाऊस रोड ते बायपास रस्त्याचे ‘सद्गुरू वामनराव पै’ नामकरण
- प्रभाग क्र. १७ मधील शंभर फुटीपर्यंतच्या एका रस्त्यास निसर्गप्रेमी शिवाजीराव ओऊळकर यांचे नाव.
- जातिवाचक रस्ते, वस्त्यांची नावे बदलणार
- रस्ता रुंदीकरणात बाधित होणारी शिवाजी स्टेडियमची पूर्वेकडील भिंत, जुनी पॅव्हेलियन इमारत पाडण्यास मान्यता.
- हिराबाग वॉटर वर्क्स येथील जुन्या शाळेची इमारत पाडून सांस्कृतिक हॉल होणार.
- सेवेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना सानुग्रह अनुदान देणार.
- प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २८८ सदनिकांचा मंजूर प्रकल्प जागेअभावी रद्दचा प्रस्ताव शासनाला पाठवणार.
दुप्पट पाणीपट्टी आकारण्याचा निर्णय प्रलंबित
ज्या ग्राहकांचे पाण्याचे मीटर बंद आहेत, त्यांना जोपर्यंत नवीन सुस्थितीत मीटर बसत नाही, तोपर्यंत पूर्वीच्या तुलनेत दुप्पट पाणीपट्टी आकारण्याचा विषय प्रलंबित ठेवण्यात आला.