सहा महिन्यांत पूर्ण होणार : सांगलीत जखमी वन्यप्राण्यांसाठी प्राथमिक उपचार केंद्रास मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:15 PM2020-02-26T23:15:59+5:302020-02-26T23:17:50+5:30
चांदोली, दंडोबा, सागरेश्वर आदी ठिकाणी जखमी प्राणी आढळतात. मोठ्या वर्दळीच्या मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या धडकेत जायबंदी होण्याचे प्रसंग तर रोजचेच आहेत. काही ठिकाणी लोकांकडून झालेली मारहाणही जिवावर बेतते.
संतोष भिसे ।
सांगली : जखमी वन्यप्राण्यांवर उपचारासाठी सांगलीत वन्यप्राणी प्राथमिक उपचार केंद्राला (ट्रान्झीट ट्रीटमेन्ट सेंटर) मंजुरी मिळाली आहे. वन विभागाने त्यासाठी ३९ लाखांचा निधी देऊ केला असून, सहा महिन्यात केंद्र प्रत्यक्षात येण्याची अपेक्षा आहे. नागपूर, चंद्रपूर आणि अमरावतीनंतरचे हे राज्यातील चौथे शासकीय उपचार केंद्र ठरले आहे.
जिल्ह्यात वनक्षेत्र मोठे असून वन्यप्राण्यांची संख्याही खूपच आहे. विविध घटनांत ते जखमी होतात, तेव्हा उपचारासाठी जनावरांचे स्थानिक दवाखाने किंवा मिरजेतील शासकीय पशुचिकित्सालयात न्यावे लागते. अनेकदा प्राणीप्रेमीच उपचार करुन त्यांना जंगलात नेऊन सोडतात. सध्या जवळजवळ दररोजच जिल्हाभरातून कोठे ना कोठे वन्यप्राणी जखमी झाल्याची वर्दी येतेच. चांदोली, दंडोबा, सागरेश्वर आदी ठिकाणी जखमी प्राणी आढळतात. मोठ्या वर्दळीच्या मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या धडकेत जायबंदी होण्याचे प्रसंग तर रोजचेच आहेत. काही ठिकाणी लोकांकडून झालेली मारहाणही जिवावर बेतते. माकड, कोल्हे, लांडगे, मोर, साप, घुबड, गरुड हे पशु-पक्षी जखमी होण्याचे प्रमाण मोठे आहे. पतंगाच्या मांजातही पक्षी अडकतात.
हे लक्षात घेऊन सांगलीत स्वतंत्र उपचार केंद्राची मागणी प्राणीप्रेमींनी केली. सांगलीचे उपवनरक्षक प्रमोद धानके यांनी नागपूरला राज्याच्या मुख्य वनरक्षकांकडे प्रस्ताव पाठविला, त्याला मंजुरी मिळाली. सुमारे ३९ लाखांचा निधी उपलब्ध केला. कुपवाडमध्ये वन विभागाच्या कार्यालयात केंद्र सुरु होईल. तेथे पशुवैद्यक, दोघे पॅराव्हेट तथा सहायक, मदतनीस असे कर्मचारी असतील. सुसज्ज रुग्णवाहिका, शस्त्रक्रियागृह, फिरते क्ष-किरण यंत्र, उपचार झालेल्या प्राण्यांसाठी विश्रांतीगृह, पिंजरे अशा सुविधा असतील. डॉक्टर चोवीस तास उपलब्ध असेल. जखमी प्राण्याला रुग्णवाहिकेतून आणून उपचारानंतर पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल.
राज्यातील चौथे केंद्र
राज्यात वनक्षेत्र व वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. शासकीय प्राथमिक उपचार केंदे्र तथा दवाखाने (ट्रान्झीट ट्रीटमेन्ट सेंटर) अवघे तीनच आहेत. नागपूर, चंद्रपूर व अमरावतीमध्ये उपचारांची सोय आहे. कोल्हापूर, नाशिक, पुणे आदी जिल्ह्यांत खासगी दवाखाने, स्वयंसेवी संस्था किंवा महापालिकेच्या दवाखान्यांत उपचार केले जातात. आता सांगलीत चौथे शासकीय केंद्र सुरु होईल. खासगी मालकीच्या प्राण्यांवर मात्र येथे उपचार होणार नाहीत, त्यासाठी पशुचिकित्सालयातच जावे लागेल.