तासगाव येथे प्रांत कार्यालयास लवकरच मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:31 AM2021-08-20T04:31:20+5:302021-08-20T04:31:20+5:30
फोटो ओळ : तासगाव येथे प्रांत कार्यालय सुरू करावे, या मागणीचे निवेदन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना राजीव मोरे यांनी ...
फोटो ओळ : तासगाव येथे प्रांत कार्यालय सुरू करावे, या मागणीचे निवेदन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना राजीव मोरे यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यांसाठी तासगाव येथे प्रस्तावित असलेल्या उपविभागीय कार्यालयास येत्या १५ दिवसात मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस राजीव मोरे यांनी दिली. गुरुवारी राजीव मोरे यांनी याबाबतचे निवेदन महसूलमंत्र्यांना दिले आहे.
राजीव मोरे म्हणाले, दोन तालुक्यांसाठी एक उपविभागीय कार्यालय करण्याचा निर्णय सरकारने घेतला. यानुसार तासगाव आणि कवठेमहांकाळ या तालुक्यांसाठी उपविभागीय कार्यालय करावे, असा प्रस्ताव ३० जून २०१७ रोजी उपविभागीय अधिकारी मिरज यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी विजय काळम - पाटील यांच्याकडे पाठविला होता.
१ जुलै २०१७ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी विजय काळम - पाटील यांनी तासगाव उपविभाग निर्मितीबाबतचा प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्तांकडून मंत्रालयात सादर झाला आहे. या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन केली. या विनंतीस मान देऊन बाळासाहेब थोरात यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात माहिती घेतली. हा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे समजताच तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असे आदेश सचिवांना दिले. तसेच पंधरा दिवसात या प्रस्तावाला मंजुरी देऊन विषय मार्गी लावू, अशी ग्वाही दिली आहे. लवकरच तासगाव प्रांत कार्यालयाच्या मंजुरीची घोषणा होईल, असे राजीव मोरे यांनी सांगितले.