जिल्ह्याच्या ४४२ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:26 AM2021-01-25T04:26:51+5:302021-01-25T04:26:51+5:30
सांगली : जिल्ह्यातील विकासकामांच्या निधीसाठी आवश्यक असलेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या ४४२ कोटी ८८ लाखांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या ...
सांगली : जिल्ह्यातील विकासकामांच्या निधीसाठी आवश्यक असलेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या ४४२ कोटी ८८ लाखांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर देण्यात आली. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा ३५८ कोटी ९ लाखांचा असून, विशेष घटक कार्यक्रम आराखडा ८३ कोटी ८१ लाख रुपयांचा आहे. यावर्षी शासनाने दिलेला प्रारूप आराखडा ३१५ कोटी ६२ लाखांचा असून, १२७ कोटी २६ लाख रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे.
पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांची उपस्थिती होती.
बैठकीच्या सुरुवातीला २०२०-२१ मध्ये मंजूर निधी व विकासकामांवर खर्च झालेल्या निधीचा आढावा घेण्यात आला. कोरोना संसर्गावेळी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांसाठी २७ कोटींचा निधी वापरण्यात आला आहे. यावर्षी आतापर्यंत २० टक्के निधीचा विनीयोग झाल्याने उर्वरित निधीही तातडीने खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या. एकूण ३६९ कोटी ७९ लाख रुपयांचा मंजूर निधीपैकी ७१ कोटी ७ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे १९.२२ टक्के निधीच खर्च झाला असून, उर्वरित निधीचे तातडीने नियोजन करून कोणत्याही स्थितीत अखर्चिंत राहणार नाही, असे नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी
दिले.
यावेळी आमदार मोहनराव कदम, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, अरुण लाड, सुरेश खाडे, अनिल बाबर, सुधीर गाडगीळ, सुमनताई पाटील, मानसिंगराव नाईक, विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.