विद्यापीठ उपकेंद्राची खानापूरलाच मंजुरी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:22 AM2021-07-17T04:22:18+5:302021-07-17T04:22:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क - विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर, आटपाडी, कडेगाव, जत, माण, खटाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा दर्जा उंचावून ...
लोकमत न्यूज नेटवर्क -
विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर, आटपाडी, कडेगाव, जत, माण, खटाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा दर्जा उंचावून शैक्षणिक ऊर्जा देणारे केंद्र होणार आहे. त्यामुळे ते खानापूर येथेच मंजूर व्हावे, अशी मागणी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याकडे केल्याची माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. उमेश देशमुख यांनी दिली.
देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी संघटनेने कुलगुरू डॉ. शिर्के यांना निवेदन दिले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कॉ. डॉ. उदय नारकर, कॉ. गोपीनाथ सूर्यवंशी, अक्षय भगत, ऋषीकेश देसाई, जालिंदर पवार उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, जिल्ह्यात उपकेंद्र २०१३ला मंजूर करण्यात आले. त्याची प्रक्रियाही सुरू झाली. त्यावेळी नेमलेल्या समितीने काही जागा पाहिल्या. त्यातील खानापूर व पेडची जागा आरक्षित करण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली. त्यानंतर समितीच बदलली गेली. त्यानंतरच्या काळात कोविड साथ सुरू झाली. खानापूर, आटपाडी, जत, तासगाव तसेच सातारा जिल्ह्यातील माण, खटाव या शैक्षणिकदृष्ट्या मागास भागासाठी वरदान ठरणारे हे उपकेंद्र खानापूरलाच झाले पाहिजे.
फोटो - १६०७२०२१-विटा-शिवाजी विद्यापीठ : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथेच मंजूर करण्याबाबतचे निवेदन कॉ. उमेश देशमुख यांनी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांना दिले. यावेळी कॉ. डॉ. उदय नारकर, कॉ. गोपीनाथ सूर्यवंशी, अक्षय भगत यांच्यासह शिष्टमंडळ उपस्थित होते.