२८८ कोटींच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी
By admin | Published: January 23, 2015 12:24 AM2015-01-23T00:24:28+5:302015-01-23T00:40:03+5:30
जिल्हा नियोजन समिती सभा : कुपोषित बालकांना जादा निधी देणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती
सांगली : जिल्ह्याला आगामी आर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजनांसाठी २८८ कोटींच्या वार्षिक योजना आराखड्यास आज (गुरुवार) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.जिल्हा नियोजन समितीची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात झाली. यावेळी खा. संजय पाटील, खा. राजू शेट्टी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, आ. सुरेश खाडे, आ. शिवाजीराव नाईक, आ. विलासराव जगताप, आ. सुधीर गाडगीळ, आ. अनिल बाबर, आ. प्रभाकर घार्गे, आ. दत्तात्रय सावंत, बुधाजीराव मुळीक, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलीस अधीक्षक दिलीप सावंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज कारचे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यासाठी तयार केलेल्या २८८ कोटींच्या वार्षिक योजना आराखड्यामध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी २१० कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ७७ कोटी ४ लाख आणि ओटीएसपीसाठी १ कोटी २ लाखाच्या निधीच्या तरतुदीचा समावेश आहे. जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिलेला हा २८८ कोटींचा आराखडा शासनस्तरावरुन मंजूर करुन घेतला जाणार आहे.
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना आणि ओटीएसपीसाठी (एकरकमी परतफेड योजना) यंदा म्हणजे २०१४-१५ मध्ये नोव्हेंबरअखेर झालेल्या खर्चावर आधारित पुनर्विनियोजन प्रस्तावासही मान्यता देण्यात आली. जिल्ह्यात सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०१४-१५ साठी १७५ कोटींची तरतूद मंजूर असून, आठमाही खर्चावर आधारित पुनर्विनियोजन प्रस्तावामध्ये विविध योजनांवरील खर्च न होणारा ९ कोटी ९८ लाख २४ हजारांचा निधी उपलब्ध आहे. तसेच अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत ५९ लाख ८६ हजारांचा, तर ओटीएसपीअंतर्गत १८ लाख खर्च न झालेला निधी उपलब्ध आहे. हा निधी येत्या मार्चअखेर अन्य योजनांवर खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कुपोषित बालकांसाठी यंदाच्या आराखड्यातून सुमारे ७ हजार कुपोषित बालकांसाठी जादा निधी देण्याचा प्रस्ताव सदस्यांनी सादर करावा, याबाबत सदस्या पवित्रा बरगाले यांनी पुढाकार घेऊन बालकांना साहाय्यभूत होणारा सर्वंकष प्रस्ताव समितीकडे सादर करावा, असा असा आदेश पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिला. (प्रतिनिधी)
समितीमध्ये हे निर्णय झाले....
ग्रामीण भागातील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यासाठी तीन महिला सदस्यांची समिती गठित करणार
शाळांमधील संगणक कक्षांना आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना शस्त्रक्रिया करण्यासाठी सोलर ऊर्जा प्रकल्प बसविण्याचा प्रस्ताव
येत्या मार्चअखेर ५०० अंगणवाड्या आयएसओ मानांकित करणार, त्यासाठी प्रत्येकी ५० हजारांचा निधी देणार
जिल्ह्यात संगणक साक्षरतेसाठी मोबाईल कॉम्प्युटर व्हॅन खरेदी करण्यास मंजुरी
वसंतदादा पाटील स्मारक आणि हिंदकेसरी मारुती माने स्मारकाच्या कामाला गती देणार.