खरसुंडी येथे कोविड केअर सेंटर मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:26 AM2021-04-22T04:26:23+5:302021-04-22T04:26:23+5:30
खरसुंडी : आटपाडी तालुक्यात लॉकडाऊनचे कडक निर्बंध असताना लोकांच्या हलगर्जीपणामुळे कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ दिवसेंदिवस होत आहे. ...
खरसुंडी :
आटपाडी तालुक्यात लॉकडाऊनचे कडक निर्बंध असताना लोकांच्या हलगर्जीपणामुळे कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ दिवसेंदिवस होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. याची जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत खरसुंडी येथील भिवघाट रस्त्यावरील गेस्ट हाऊस इमारतीमध्ये कोविड केअर सेंटरसाठी मंजुरी दिली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी या इमारतीची पाहणी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, पंचायत समितीचे माजी सभातपी हर्षवर्धन देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जाधव, डॉ. उमेश पुजारी, अर्जुन पुजारी, राहुल गुरव, माजी उपसरपंच जितेंद्र पाटील उपस्थित होते.
खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोरोना लसीकरण सुरू असून नागरिकांचा प्रतिसाद मोठा आहे. कोरोना रुग्णांना योग्य ती तातडीची कोविड प्रतिबंधक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी राहुल गुरव, डॉ. उमेश पुजारी, जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यास यश मिळाले. येत्या काही दिवसांत कोरोना रुग्णांना योग्य ती उपचार सेवा मिळणार असल्याने गावातून समाधान व्यक्त होत आहे.
चौकट
लसीकरणास प्रतिसाद
खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावामध्ये २० पॉझिटिव्ह संख्या असून २५ कोरोना रुग्णांवर उपचार करून बरे झाले आहेत. दोन हजारांहून अधिक नागरिकांना कोरोना लस देण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जाधव यांनी दिली.