‘मोरणा’वर कोल्हापूर पद्धतीने दोन बंधारे मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:32 AM2021-04-30T04:32:56+5:302021-04-30T04:32:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मांगले : मोरणा नदीवरील चिखलवाडी व शिंगटेवाडी येथील दोन स्वतंत्र बंधाऱ्याच्या कामांना मंजूरी मिळाली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मांगले : मोरणा नदीवरील चिखलवाडी व शिंगटेवाडी येथील दोन स्वतंत्र बंधाऱ्याच्या कामांना मंजूरी मिळाली आहे. दोन कोटी रुपयाच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची कामे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले की, मोरणा नदीपात्रात मोरणा धरणाबरोबरच वाकुर्डे बुद्रुक योजनेतून पाणी सोडण्यात येते. त्यामुळे मोरणा नदीकाठावरील शेतीला पाणी मिळत आहे. मात्र जांभळेवाडी, शिंगटेवाडी, चिखलवाडी शिवारालगत मोरणा नदीपात्र तीव्र उताराचे असून, या परिसरात बंधारा नसल्यामुळे नदीचे पाणी खाली वाहून जाते. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना सतत पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची बंधारा बांधण्याची अनेक वर्षांची मागणी पूर्ण करण्यात आली आहे.
चिखलवाडी व शिंगटेवाडी परिसरात दोन कोटी रुपयाचे दोन बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर जांभळेवाडी शिवारालगतही आणखी एक बंधारा बांधण्यात येणार आहे. या बंधाऱ्यामुळे मोरणा जलाशय ते वारणा नदीपर्यंतचे मोरणा नदीपात्र बारमाही होणार आहे. मोरणा खोऱ्यातील शेतीला त्याचा खूप मोठा फायदा होणार असून, संपूर्ण शेती बागायती होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
आमदार मानसिंगराव नाईक यांनी बंधारा उभारण्यात येणाऱ्या ठिकाणाची पाहणी केली. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल पवार, संभाजी उपलाने, भीमराव साळुंखे, जनार्दन पायमल, सरपंच दादासाहेब मांगलेकर, उपसरपंच सचिन मरळे, आनंदा जाधव, धनाजी जाधव, प्रकाश पवार, विश्वास देसाई, संजय जाधव, वाजीद पीरजादे, अजित सावंत, सुहास सावंत, चंद्रकांत पवार, शंकर शिंगटे, दीपक शिंगटे, सचिन शिंगटे, संदीप शिंगटे, संपत शिंगटे उपस्थित होते.
फोटो - मोरणा नदीचे पात्र कोरडे.