एप्रिल वाढविणार जिल्ह्याचा ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:26 AM2021-04-02T04:26:18+5:302021-04-02T04:26:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मार्च महिन्यात जिल्ह्याने तापमानाच्या चाळिशीचा अनुभव घेतल्यानंतर आता एप्रिल महिनाही जिल्ह्याचा ताप वाढविणारा ठरणार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मार्च महिन्यात जिल्ह्याने तापमानाच्या चाळिशीचा अनुभव घेतल्यानंतर आता एप्रिल महिनाही जिल्ह्याचा ताप वाढविणारा ठरणार आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या सहा दिवसांतच कमाल तापमान ४२ अंशाच्या घरात जाणार आहे.
जिल्ह्यात मार्च महिन्यात कमाल तापमान ३६ ते ४० च्या तर किमान तापमान २० ते २४ अंश सेल्सिअसच्या घरात होते. मार्चचा दुसरा पंधरवडा नागरिकांसाठी खूप तीव्र झळांचा राहिला. आता एप्रिल महिनाही सतावणार आहे. या महिन्यात तापमान विक्रमाच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याची आजवरची कमाल तापमानाची सरासरी ३८.५ तर किमान तापमानाची सरासरी २१.५ अंश सेल्सिअस इतकी आहे. सध्या सरासरीपेक्षा अधिक तापमान नोेंदले जात आहे.
चौकट
गुरुवारचे रेकॉर्ड
जिल्ह्यात गुरुवार, १ एप्रिल रोजी कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. बुधवारच्या तुलनेत यात चार अंशाने वाढ झाली आहे.
किमान तापमानात बुधवारच्या तुलनेत दोन अंशाने घट झाली असून, तापमान १९ अंशावर आले आहे.
चौकट
असा राहील आठवडा
जिल्ह्यात आगामी आठवडा तप्त झळांचा राहणार आहे. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार ३ ते ५ एप्रिल या कालावधीत कमाल तापमान ४१ ते ४२ अंशापर्यंत राहणार आहे.
किमान तापमान १९ ते २० अंशाच्या घरात राहणार असल्याने रात्रीचा उकाडा काहीअंशी कमी होणार आहे.