‘आरफळ’च्या मुरुमाची तस्करी
By admin | Published: July 21, 2014 11:48 PM2014-07-21T23:48:30+5:302014-07-21T23:48:30+5:30
बांबवडेतील प्रकार : ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष
मोहन बाबर- येळावी
पलूस तालुक्यातील बांबवडेच्या उत्तरेकडून जाणाऱ्या आरफळ कालवा खुदाईतून निघालेल्या मुरुमाची राजरोसपणे तस्करी सुरू आहे. या कामाचा ठेकेदार सात ते आठ डंपर व यंत्रासह सापडूनही त्याच्यावर कारवाई केली जात नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदार शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
बांबवडे येथील आरफळ पोटकालव्याच्या सात ते आठ किलोमीटर अंतरावर राजापूर-बांबवडे रस्त्यानजीक पश्चिमेस मुरुम व दगड ठेकेदार बिनदिक्कतपणे नेत आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर आरफळ विभागाचे मुख्य अभियंता संकपाळ यांनी शाखा अभियंता मुल्ला व ए. पी. पाटील यांना जागेचा पंचनामा करून फौजदारी गुन्हा नोंद करण्यास सांगितले होते. या दोन अधिकाऱ्यांना मुद्देमालासह ठेकेदार सापडला असूनही त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ‘लोकमत’ने वेळोवेळी हा प्रकार उजेडात आणला आहे. त्यावेळी संबंधित ठेकेदाराला जुजबी दंड करून सोडून देण्यात आले. यापूर्वीही दोनवेळा शाखा अभियंता मुल्ला यांनी कारवाई न करता ठेकेदारास सूट दिली होती. संबंधित शाखा अभियंता मुल्ला यांची बदली नगर जिल्ह्यात झाली असूनही ते येथेच ठाण मांडून बसल्याचे समजते.