सांगली: कवलापूर विमानतळावरुन जुंपली, शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये वादाचे विमानोड्डाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 12:50 PM2022-10-25T12:50:39+5:302022-10-25T12:51:09+5:30
महाविकास आघाडीच्या धावपट्टीवरून निवडणुका जिंकण्यासाठी उड्डाण घेऊ पाहणाऱ्या शिवसेना व राष्ट्रवादी या घटक पक्षांत कवलापूर विमानतळाच्या जागेवरून ठिणगी
अविनाश कोळी
सांगली : महाविकास आघाडीच्या धावपट्टीवरून निवडणुका जिंकण्यासाठी उड्डाण घेऊ पाहणाऱ्या शिवसेना व राष्ट्रवादी या घटक पक्षांत कवलापूर विमानतळाच्या जागेवरून ठिणगी पडली आहे. एकमेकांचे वस्त्रहरण करण्याची तयारी दोन्ही पक्षांनी केल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जिल्ह्यातच महाविकास आघाडीच्या बांधणीला धक्का बसला आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह अन्य निवडणुका जिंकण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला कायम ठेवण्याचा निश्चय जयंत पाटील यांनी अनेकदा बोलून दाखविला. डोईजड झालेल्या भाजपला शह देण्यासाठी सांगली जिल्ह्यातही त्यांचे आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत, मात्र त्यांच्या या प्रयत्नांना त्यांच्याच जिल्ह्यात सुरुंग लावला जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी कवलापूर विमानतळाची जागा गुजराती कंपनीला देण्याच्या विषयावरून थेट शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच टीका केल्याने जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला शिंगावर घेण्यास सुरुवात केली आहे.
मिरज तालुक्यातील कवलापूरच्या जागेवरून शिवसेनेने आता थेट जयंत पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जागेच्या वादात कोणाची बाजू योग्य हा विषय संंशोधनाचा असला तरी या विषयाने दोन्ही घटक पक्षांमध्ये वाद पेटविला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या बांधणीला जबरदस्त धक्का बसू शकतो.
शिवसेना व राष्ट्रवादीतील वाद नवा नाही. यापूर्वी जयंत पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्यातही अनेकदा खटके उडाले आहेत. जयंत पाटील हे पालकमंत्री असताना अनेक समित्यांमध्ये शिवसेनेला डावलल्याची भावना व्यक्त केली होती. त्यावेळी हा वाद मुंबईपर्यंत पोहचला होता. आताही कवलापूर विमानतळावरुन सुरू झालेला वाद महाविकास आघाडीचे विमान खाली उतरविण्यास कारणीभूत ठरू शकतो.
राष्ट्रवादी-काँग्रेसमध्येही बिनसलेलेच
महाविकास आघाडीचा तिसरा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसशीही राष्ट्रवादीचे बिनसले आहे. काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत माजी मंत्री विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादीबाबत योग्यवेळी कठोर निर्णय घेऊ, असा इशारा दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीशी सध्या दोन्ही पक्ष चार हात दूर राहणे पसंत करीत आहेत.