Sangli: जतमध्ये भाजपच्या पडळकर-रवी पाटील गटात धुमश्चक्री, शिवीगाळ करत एकमेकांच्या अंगावर धावले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 01:35 PM2024-10-07T13:35:40+5:302024-10-07T13:37:23+5:30

कन्नड भाषेतून शिवीगाळ

Argument between supporters of MLA Gopichand Padalkar and Ravi Patil in BJP meeting at Jat sangli | Sangli: जतमध्ये भाजपच्या पडळकर-रवी पाटील गटात धुमश्चक्री, शिवीगाळ करत एकमेकांच्या अंगावर धावले

Sangli: जतमध्ये भाजपच्या पडळकर-रवी पाटील गटात धुमश्चक्री, शिवीगाळ करत एकमेकांच्या अंगावर धावले

जत : विधानसभा निवडणुकीत भूमिपुत्रास संधी देण्याच्या विषयावरून जत येथील भाजपाच्या बैठकीत आमदार गोपीचंद पडळकर व जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांच्या समर्थकांत जोरदार धुमश्चक्री झाली. वादावादी, शिवीगाळ, खुर्च्यांची फेकाफेकी करीत समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून गेले.

जत विधानसभा क्षेत्राचे प्रभारी रमेश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी रविवारी चार वाजता जतमध्ये डॉ. रवींद्र आरळी यांच्या महाविद्यालयात भाजपच्या प्रमुख पदाधिकारी, बुथ प्रमुख, वॉरियर्स यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत जत विधानसभा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे कसा घेता येईल यासंदर्भात चर्चा व उमेदवारीबद्दल पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात येत होता. रवी पाटील यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी जतमध्ये भूमिपुत्रालाच संधी द्यावी, असा मुद्दा मांडला. याला आमदार पडळकर समर्थकांनी आक्षेप घेतला. 

यावरूनच जोरदार वादावादीस सुरुवात झाली. या बैठकीस भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी जोरदार खडाजंगी आणि वादावादी झाली. दोन्ही गटांचे समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. वाद विकोपाला जात असल्याचे लक्षात येताच ज्येष्ठ नेते डॉ. रवींद्र आरळी, प्रभारी रमेश देशपांडे, तम्मनगौडा रवी पाटील, अप्पासाहेब नामद, दिग्विजय चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले.

भाजपचे काही स्थानिक पदाधिकारी व आमदार पडळकर समर्थक यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासूनच अंतर्गत धुसफूस सुरू आहे. पक्षाने अजून कोणालाही उमेदवारीचा शब्द दिला नसला तरी दोन्ही गटांकडून उमेदवारी आपणालाच मिळेल, असा दावा केला जात आहे.

इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणीही करण्यात येत आहे. उमेदवारीच्या याच मुद्द्यावरून जत भाजपमधील वातावरण प्रचंड तापले आहे. प्रभारी रमेश देशपांडे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत हा वाद उफाळला. निवडणूक जवळ येईल तसे उमेदवारीच्या प्रश्नावरून पक्षांतर्गत वातावरण आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते आता जत विधानसभेचा तिढा कसा सोडवणार? याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

भूमिपुत्र शब्द खटकला

भूमिपुत्रालाच उमेदवारी देण्यात यावी, असा मुद्दा कार्यकर्ते डी. एस. कोटी या कार्यकर्त्यांने बैठकीत मांडला. वैयक्तिक भूमिका न मांडता पक्षासंदर्भात बोला, अशी सूचना पडळकर यांच्या समर्थकांनी केली. यावरून पडळकर यांचे कार्यकर्ते लक्ष्मण जखगोंड व मुचंडीचे सरपंच रमेश देवर्षी आक्रमक झाले. जखगोंड यांनी माईक घेतला असता त्यांना बोलू दिले नाही. तम्मनगौडा रविपाटील यांनी त्यांच्या हातातील माईक हिसकावून घेत असताना जखगोंड व तम्मनगौडा रवी पाटील यांच्यात वादावादी झाली.

कन्नड भाषेतून शिवीगाळ

वादावादीत कन्नड भाषेत अश्लील शिवीगाळ करण्यात आली. दोन्ही गटातील खाली बसलेल्या दोन गटांतील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या भिरकावल्या. त्यामुळे पक्ष निरीक्षक देशपांडे यांनी ही बैठक बरखास्त करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यानंतर कार्यकर्ते निघून गेले.

जगताप, जमदाडे यांची अनुपस्थिती

लोकसभेला अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार केलेले माजी आमदार विलासराव जगताप हे कोणत्याही भाजपा बैठकीस उपस्थित राहिले नाहीत. भाजपाकडून इच्छुक असलेले व जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे हेसुद्धा या बैठकीस अनुपस्थित होते.

Web Title: Argument between supporters of MLA Gopichand Padalkar and Ravi Patil in BJP meeting at Jat sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.